कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा सध्या सगळ्यांपासून दूर परदेशात सुट्ट्या व्यतीत करत असल्याचं समजत आहे. गेल्या काही महिन्यांत कपिलच्या आयुष्यात अनेक नाट्यमय घटना घडल्या. यामुळे नैराश्येत गेलेल्या कपिलनं प्रसिद्धीपासून चार हात लांबच राहणं पसंत केलं आहे. पण कपिलच्या तब्येतीवर परिणाम झाल्याचं समजताच कपिलचा कट्टर स्पर्धक असलेल्या कृष्णा अभिषेकनं तब्बल पाच वर्षांनी त्याला मेसेज केला. कृष्णानं नुकतचं एका मुलाखतीत हे मान्य केलं आहे.

कपिल आणि कृष्णा हे दोघंही प्रसिद्ध कॉमेडिअन आहेत. या दोघांमधलं वैरही अनेकांना माहिती आहे. मात्र कपिलची तब्येत बिघडल्यानंतर कृष्णानं त्याला स्वत:हून मेसेज केला. ‘वारंवार मी कपिल ठीक नसल्याचं वृत्त वाचत होतो, ऐकत होतो त्या बातम्या ऐकून मला खूपच वाईट वाटायचं. अखेर पाच वर्षांनंतर मी त्याला तब्येतीची विचारपुस करण्यासाठी मेसेज करायचं ठरवलं. त्याच्यासोबत काम करण्याची माझी इच्छाही होती. त्याची हरकत नसती तर मी त्याच्या शोमध्ये कामही केलं असतं’ असंही कृष्णा एका मुलाखतीत म्हणला. कपिल आणि कृष्णामधलं वैर हे सर्वश्रुत आहे.. कपिलनं आपल्या शोमध्ये त्याला संधी दिली नाही, मात्र दुर्दैवानं कपिलचा नवा शो हा दोन भागांनंतरच बंद झाला.

नुकताच चित्रपट निर्माते विनोद तिवारी यांनी कॉमेडियन कपिल शर्माच्या आयुष्यावर आधारित बायोपिक तयार करण्याचा मानस बोलून दाखवला होता. ‘या बायोपिकमध्ये कृष्णा अभिषेक कपिलची भूमिका साकारेन. कृष्णा आणि कपिल दोघंही कॉमेडियन आहेत. कपिलला कृष्णा जवळून ओळखतो आणि तोच कपिलला न्याय मिळवून देईन असं मला वाटतं’ अशी प्रतिक्रिया तिवारी यांनी दिली होती. तेव्हा कदाचित चित्रपटामुळे तरी दोघांमधला दुरावा मिटेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.