हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देशात तीव्र शब्दात संताप व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये दाक्षिणात्य चित्रपट निर्माता डेनियल श्रवणने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने पोस्टमध्ये महिलांनी कंडोम बाळगा आणि बलात्काऱ्यांना सहकार्य करा असे वादग्रस्त विधान केले. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि अनेकांनी श्रवणवर निशाणा साधला आहे.

महिलेची हत्या न करता गुन्हेगारांनी बलात्कार करून थांबावे यासाठी सरकारने कायदेशीर तरतुदी करून प्रोत्साहन द्यावे अशी विचित्र मागणी श्रवणने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केली. तसेच १८ वर्षांवरील मुलींनाही याबाबत प्रशिक्षित करण्यात यावे असे सांगताना श्रावणने चक्क मुलींनी पुरूषांच्या कामवासनेस प्रतिकार करू नये असा सल्ला दिला आहे. हे केले तरच अशाप्रकारच्या हत्या थांबतील असे तर्कही त्याने मांडले आहेत. त्याच्या या पोस्टवर नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय वेब सीरिज सेक्रेड गेम्समधील अभिनेत्री कुब्रा सैतने उर्फ कुकूने देखील संताप व्यक्त केला आहे.

‘हा डेनियल श्रवण जो कोणी आहे त्याला वैद्यकिय उपचाराची गरज आहे. त्याचे डोके ठिकाणावर नाही’ असे म्हणत कुब्राने डेनियलला खडे बोल सुनावले आहेत.

आणखी वाचा : कंडोम बाळगा आणि बलात्काऱ्यांना सहकार्य करा, निर्मात्याचे वादग्रस्त विधान

श्रवणनची ही पोस्ट काही मिनिटातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आणि त्याच्यावर तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला. काही वेळातच श्रवणने त्याची ही पोस्ट डिलीट केली. मात्र अनेकांनी हा डेनियल कोण आहे? याचे डोके ठिकाणावर आहे? त्याने त्याच्या घरापासून याची सुरुवात करावी असे म्हणत सुनावले आहे.