‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार असल्याची निराशाजनक बातमी सोनी वाहिनीकडून येत असतानाच दुसरी एक आनंदाची बातमीसुद्धा समोर येतेय. वाहिनीवरील रोमॅण्टिक मालिका ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ परतणार आहे. अभिनेता शाहिर शेख आणि अभिनेत्री एरिका फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका असलेली ही मालिका २५ ऑगस्टपासून बंद झाली होती. प्रेक्षकांच्या खास आग्रहास्तव सप्टेंबरमध्ये ही मालिका पुन्हा सुरु होणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सोनी वाहिनीने ‘कुछ रंग प्यार के…’ मालिका पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. रविवारपासून मालिकेची टीम शूटिंग सुरु करणार असून ११ किंवा १८ सप्टेंबरपासून ही मालिका प्रसारित होईल. मालिकेतील देव आणि सोनाक्षी या मुख्य भूमिकांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला. ही मालिका लोकप्रिय होण्यामागे शाहिर आणि इरिकामधील रोमॅण्टिक केमिस्ट्री हे महत्त्वाचं कारण आहे. सध्या या मालिकेच्या वेळेत म्हणजेच रात्री ९ वाजता अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो प्रसारित होतोय.

‘वाहिनीने मालिका पुन्हा सुरु करण्यास सांगितल्याने आम्हाला खूप आनंद झाला. मालिकेच्या कथेत आम्ही सध्या काहीच बदल करणार नसून जिथे शेवट झाला तेथूनच सुरुवात करणार आहोत,’ असे मालिकेच्या सूत्रांनी सांगितले. शाहिर शेखनेही ट्विटरवर ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.