सिनेसृष्टीत आता प्रत्येक कलाकार आपली व्यक्तिरेखा अधिकाधिक वास्तववादी वाटावी यासाठी मेहनत घेताना दिसून येत आहेत. त्यातही अभिनेते त्यांची व्यक्तिरेखा अधिक सशक्त वाटावी आणि सिनेमा अधिक खरा वाटावा म्हणून मेहनत घेताना दिसत आहेत. आमिर खानने ‘दंगल’ सिनेमात त्याच्या शरीरावर घेतलेली मेहनत तर सगळ्यांनाच माहित आहे. आमिरने ९० किलो वजन वाढवले होते आणि तेवढेच नंतर कमीही केले होते. तर दुसरीकडे संजय दत्तच्या बायोपिकसाठी रणबीर कपूरही १० दिवस भोपाळच्या कारागृहात राहून संजयची त्या दिवसांतली मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आता या कलाकारांमध्ये असाही एक कलाकार आहे ज्याने आपल्या शरिरावर अथक मेहनत घेतली आहे. अभिनेता कुणाल कपूरने बुधवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला यात त्याच्या शरिरात झालेले बदल दिसून येतात.

‘डीएनए’ या वृत्तपत्राशी बोलताना कुणाल म्हणाला की, ‘मी ६ महिन्यांपर्यंत अगदी जनावरांप्रमाणे ट्रेनिंग घेत होतो. मी पहिल्यापासूनच तंदुरुस्त होतो पण बलदंड नव्हतो. पण हे आतापर्यंतचे माझे सर्वांत तंदुरुस्त आणि बलदंड रुप आहे. ‘वीरम’ सिनेमात मी एक योद्ध्याची भूमिका साकारली आहे. त्यामुळे मीही वास्तवात एखाद्या योद्ध्यासारखेच दिसावे, असावे असे मला वाटत होते.’

‘वीरम’ सिनेमात कुणालचा लूक हा बलदंड शरीरयष्ठी असलेल्या योद्ध्यासाठी आहेत. ट्विटरवर शेअर केलेल्या कोलाजला कॅप्शन देताना कुणालने लिहिले की, ६ महिने, २३ दिवस, १२ तास आणि २३२ प्रोटीन शेक्स घेतल्यानंतर मी असा दिसतो. सहाजिकच कुणालला बलदंड शरीरयष्ठी कमवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागली असणार. कुणाल त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नेहमीच त्याचे व्यायामाचे फोटो शेअर करत असतो. सुरुवातीला त्याच्या आगामी सिनेमासाठी तो अशी बलदंड शरीरयष्ठी बनवत आहे हे तर कोणाला कळलेही नाही.

https://www.instagram.com/p/BRpe3Evg3sp/

शेक्सपियर लिखित जगविख्यात नाटक ‘मॅकबेथ’वर आधारित या बिग बजेट सिनेमात कुणाल तेराव्या शतकातील केरळमधील योद्धा चंदू चेकवरच्या भूमिकेत दिसत आहे. सत्तेच्या लालसेपोटी होणारा त्याचा संघर्ष अत्यंत भव्यदिव्यपद्धतीने दाखवण्यात आला आहे. राजांसाठी लढाई करणारा एका योद्ध्याच्या भूमिकेत कुणाल कपूर दिसत आहे. येत्या २४ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांत हा सिनेमा बनवण्यात आला आहे. हा सिनेमा ३५ कोटींच्या बजेटसह मल्याळम भाषेतील आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा ठरला आहे. ‘३००’, ‘हंगर गेम्स’, ‘अवतार’ यांसारख्या सिनेमांचे स्टंट दिग्दर्शन केलेल्या अ‍ॅलन पॉपल्टन यांनी या सिनेमाचेही स्टंट दिग्दर्शित केले आहेत. याशिवाय, हॉलीवूड संगीतकार जेफ रोना यांनी पार्श्वसंगीत, रंगभूषाकार ट्रेफॉर प्राऊड अशा अनेक आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञांनांनी या सिनेमासाठी काम केले आहे.