सध्या बॉलिवूडमधील अनेक निर्माता दिग्दर्शकांचा ऐतिहासिक पटांकडे कल वाढत चालला आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेता आमिर खान यानं महाभारतावर आधारित चित्रपट रुपेरी पडद्यावर साकारण्याचा मानस बोलून दाखवला होता. त्यानंतर आता दिग्दर्शक कुणाल कोहलीनंही त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

रामायण या महाकाव्यावर आधारित चित्रपट कुणाल कोहली घेऊन येत आहे. या चित्रपटाचं नाव ‘रामयुग’ असणार आहे, कुणाल या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. येत्या काही महिन्यात ‘रामयुग’च्या चित्रिकरणास सुरुवात होईल. २०१९ पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होणं अपेक्षित आहे.

कुणाल कोहलीनं यापूर्वी हलक्या फुलक्या प्रेमकथांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यानं दिग्दर्शित केलेला ‘हम तुम’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता. त्यामुळे ‘रामयुग’ साकारताना मोठं आव्हान कुणालसमोर असणार आहे हे नक्की. कुणालसाठी ‘रामयुग’हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या चित्रपटातील कलाकारांची नावं गुलदस्त्यात आहेत. कुणालनं ट्विट करत त्याच्या आगामी चित्रपटाची माहिती दिली.