आपल्या कुशल विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या विनोदवीर कुशल बद्रिकेने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र यासाठी त्याला बराच स्ट्रगल करावा लागला. कुशलला लहानपणापासूनच दिसण्यावरून न्यूनगंड होता. पण आता मेहनतीच्या जोरावर मिळालेलं हे यश समाधान देणारं किंबहुना त्याही पलीकडचं वाटत असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी अवॉर्ड’मध्ये कुशलच्या आईचा सत्कार केला गेला. त्यानंतर कुशलने फेसबुक अकाऊंटवर पोस्ट लिहित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

”लहानपणी प्रगतीपुस्तकाच्या लाल शेराने नालायक ठरलेला मी, दिसायला काळा बेंद्रा, येडा गबाळा बर्‍याचदा, बर्‍याच जणांना नकोसा झालेला मी, दिवसभराचे सगळे अपमान, मार, दु:ख घेऊन तुझी कुस भिजवून टाकणारा मी. आई तू ध्रुवताऱ्याची गोष्ट सांगायचीस ना तेव्हा ध्रुवतारा व्हावंसं वाटायचं, वाटायचं सालं आपल्यापर्यंत कुणी पोहचूच नये, तू माझ्यासाठी रोज गाणं गायचीस “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे….” तू म्हणायचीस ना तस्संच झालं, त्या कुरूप वेड्या पिल्लाचा राजहंस झाला आई. माझ्या इवल्याश्या बोटांना धरून, माझ्या लटपटत्या पायांना तू चालायला शिकवलंस, आज तुझा हात धरून, तुझ्या लटपटत्या पायाने तुला स्टेजवर आणताना अख्खं आयुष्य डोळ्यासमोरून धावत गेलं. तुझ्यापोटी जन्म घेतल्याचं आज सार्थक झालं”, अशा शब्दांत कुशलने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

आणखी वाचा : तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे कुशल घराघरात पोहोचला. ”अभिनय करताना प्रत्येक पात्र मी अनुभवत असतो. प्रत्येक पात्र हे काहीतरी शिकवणारे असते. एक वेगळा अनुभव देणारे असते”, असं त्याचं मत आहे.