17 December 2017

News Flash

चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्याला अभिनेत्रीने दिली कानशिलात

क्षणाचाही विचार न करता त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावली.

मुंबई | Updated: March 20, 2017 3:00 PM

पंखुरी अवस्थी

टेलिव्हिजन अभिनेत्री पंखुरी अवस्थी ही तिच्या धाडसी कृत्यामुळे चर्चेत आली आहे. आगामी ‘क्या कसूर है अमला का?’ मालिकेत बलात्कारी पीडित मुलीची भूमिका साकारणाऱ्या पंखुरीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या व्यक्तीच्या कानशिलात लावल्याचे स्वतः सांगितले. आपल्याला त्रास देणा-या व्यक्तीविरोधात खंबीरपणे लढा दिल्याने ही गोष्ट तिच्यासाठी अभिमानास्पद असल्याचेही तिने म्हटले.

पंखुरीने गेल्या शनिवारी ‘क्या कसूर है अमला का?’ मालिकेच्या सेटवर याबाबतचा खुलासा केला. ती म्हणाली की, मी दिल्ली, चंदीगड, नोएडा, बंगळुरु यासारख्या अनेक शहरांमध्ये फिरले आहे. पण मुंबई हे महिलांसाठी सुरक्षित असलेल्या शहरांपैकी एक असल्याचे मला वाटते. मी दिल्लीत राहत होते तेव्हा कॉलेजमध्ये जाण्यासाठी दररोज मेट्रोने प्रवास करावा लागायचा. तेव्हा अशा प्रकारच्या अनेक घटना सातत्याने माझ्यासोबत घडल्या होत्या. त्यावेळी मी याकडे दुर्लक्ष केले. मात्र नंतर मला याची जाणीव होत गेली. तेव्हा रात्रीच घराबाहेर पडण्याची मला भीती वाटायची. असे सांगत स्वतःसोबत घडलेल्या प्रसंगाबद्दल पंखुरी म्हणाली की, आधी माझ्यामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद नव्हती. पण, आता माझ्यात ते बळ आले आहे. काही दिवसांपूर्वीच माझ्या मित्रमंडळींसोबत मी बंगुळरुला गेले होते. तेव्हा मी स्कर्ट घालून त्यांच्यासोबत फिरायला गेले. त्यावेळी एक मुलगा तिथे आला आणि त्याने माझ्या मांडीला हात लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा मी न घाबरता आणि क्षणाचाही विचार न करता त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावली. अशा वृत्तीच्या लोकांविरोधात आवाज उठविल्याचे मला समाधान वाटते आहे.

तुर्कीतील प्रसिद्ध मालिका ‘फातमागुल’ याचे भारतीय व्हर्जन म्हणजे ‘क्या कसूर है अमला का?’.

First Published on March 20, 2017 3:00 pm

Web Title: kya kasoor hai amla ka tv actor pankhuri awasthy slapped a man who touched her wrongly