प्रेमात गुंफ लेली रहस्यकथा आणि निर्मितीसाठी संजय लीला भन्साळी प्रॉडक्शनचं बॅनर असेल तर ‘लाल इश्का’चा गहिरा रंग प्रेक्षकांच्या मनात उमटायलाच हवा आणि या प्रेमाच्या साक्षीला असलेलं जे काय गुपित आहे तेही प्रेक्षकांसमोर अशा रीतीने उलगडलं असतं की अरे आमच्याक डे कथाच हिरो आहे फक्त भन्साळींसारखा निर्माता हवा, अशी वाहवा करत प्रेक्षक बाहेर पडले असते. स्वप्निल जोशी आणि अंजना सुखानी या जोडीचा हा ‘लाल इश्क’ मुळातच फिका आहे. त्यामुळे त्याचा भन्साळी स्टाईल लालेलाल रंगाचा गहिरेपणा हा फक्त ‘पोस्टर’वरच उतरला आहे.
‘लाल इश्क’ची संकल्पना ही वेगळी होती. काही नवे प्रयोग संकल्पनेतच दडलेले आहेत. एक खुनाची घटना, दोन संशयित जे एक मेकांच्या प्रेमात आहेत. आणि या घटनेचा तपास करणारे दोन प्रमुख अधिकारी ही खरं तर या कथेतली मुख्य पात्रे आहेत. या चारजणांमध्ये तपास आणि जाबजबानी घेण्याच्या निमित्ताने कथा घडत जाते म्हणा किंवा त्याचे एकेक पदर उलगडत जातात. रहस्यपटांची मांडणी आणि पटकथा या दोन्ही गोष्टी तितक्याच सशक्त असायला हव्यात तरच उरलेली बाजी कलाकार मारून नेतात. मात्र ‘लाल इश्क’ मांडणीत खूपच कमी पडला आहे. नाटकाच्या तालमीसाठी एका रिसॉर्टमध्ये उतरलेला ग्रुप आहे. या नाटकाचा नायक यश पटवर्धन (स्वप्निल जोशी) रिसॉर्टमध्ये काम करत असलेल्या जान्हवीच्या (अंजना सुखानी) पाहताक्षणी प्रेमात पडतो. नाटकाचे दिग्दर्शक पोद्दार (जयवंत वाडकर) यांचा खून होतो. जान्हवी आणि यश हे दोन प्रमुख संशयित असल्याने त्यांचा आणि या घटनेचा तपास करण्यासाठी आलेल्या अजिंक्य रणदिवे (कमलेश सावंत), नंदिनी निंबाळकर (समिधा गुरू) या दोन अधिकाऱ्यांचा पाठशिवणीचा उघड खेळ सुरू होतो.
एकाच घटनेची दोन वेगवेगळया लोकांकडून आलेली साक्ष आणि त्याच्या जुळवणुकीतून रहस्य उलगडण्याचा प्रयत्न हा फॉर्म अगदी अकिरो कुरोसावांच्या ‘राशोमान’ पासून पाहायला मिळतो. त्यामुळे हा फॉर्म नवीन आहे असं म्हणण्यात अर्थ नाही. मात्र हा फॉर्म चित्रपटात वापरताना प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याइतपत तो रंगवता आला पाहिजे. नाहीतर एकाच तिकिटात दोनदा चित्रपट पाहिल्याची कंटाळवाणी जाणीव प्रेक्षकाला चित्रपट पाहूच देत नाही. ‘लाल इश्क’च्या बाबतीत हीच चूक घडली आहे. स्वप्निल जोशी आणि कमलेश सावंत यांच्यात संवाद-प्रतिसंवादातून जो खेळ रंगायला हवा तोही इथे रंगत नाही. एखाद्-दुसऱ्या प्रसंगात स्वप्निल भाव खाऊन जातो. मात्र तपास अधिकारी हा कठोर आणि नीरसच असायला हवा हे मनाशी बांधून ठेवल्यासारखं कमलेश सावंत कमालीच्या मख्खपणे वावरले आहेत. त्या मानाने नंदिनीची भूमिका केलेल्या समिधाचा वावर सहज आहे. अंजना सुखानीने सेन्शुअस दिसण्याची गरज पूर्ण केली आहे. तिचे मराठी संवादही कानाला खटकत नाहीत. मात्र तरीही तिची आणि स्वप्निलची प्रेमकथा फारसा प्रभाव टाकू शकलेली नाही. स्वप्निलचा अभिनयही यावेळी या चित्रपटाला तारू शकलेला नाही. स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित ‘लाल इश्क’ हा ना धड प्रेमकथा ठरला आहे ना रहस्यमय चित्रपट. भन्साळी प्रॉडक्शनचा ठसाही फक्त ‘चांद मातला’ या गाण्यात आणि पोस्टरवरच्या लाल रंगात उतरला आहे, बाकी चित्रपट फिका पडला आहे.

लाल इश्क
निर्मिती – संजय लीला भन्साळी
दिग्दर्शक – स्वप्ना वाघमारे-जोशी
कलाकार – स्वप्निल जोशी, अंजना सुखानी, कमलेश सावंत, समिधा गुरू, जयवंत वाडकर, पियूष रानडे, स्नेहा चव्हाण, प्रिया बेर्डे, यशश्री मसुरकर, मिलिंद गवळी आणि उदय नेने.