जगप्रसिद्ध पॉप सिंगर असलेल्या लेडी गागाने आजवर तिच्या गाण्यांमधून रसिकांना वेड लावलं आहे. संगीत क्षेत्रातील मानाच्या अनेक पुरस्कारांवर लेडी गागाने नाव कोरलं आहे आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.
मात्र नुकत्याचं घडलेल्या एका घटनेमुळे लेडी गागा दुखावली गेली होती. तिचं दु:ख तिने सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. लेडी गागाच्या दोन लाडक्या श्वानांचं अपहरण करण्यात आलं होतं. ‘कोजी’ आणि ‘गुस्ताव’ असं तिच्या या लाडक्या श्वानांच नाव आहे. बुधवारी रात्री लॉस एंजल्समध्ये तिच्या श्वानांना सांभाळणाऱ्या रियान फिशर या तरुणावर काही अज्ञातांनी गोळ्या झाडून ‘कोजी आणि ‘गुस्ताव’ या श्वानांचं अपहरण केलं. यानंतर या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र या घटनेनंतर लेडी गागा प्रचंड दुखावली गेली. इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन तिने दु:ख व्यक्त केलं. ‘मला माझ्या कुटुंबाला पुन्हा एकत्र पाहायचंय’ असं म्हणत तिने श्वानांचा शोध लावणाऱ्यांसाठी इनाम जाहीर केलं. तब्बल 5 लाख डॉलर्सचं इनाम लेडी गागाने जाहीर केलं. संपर्क साधण्यासाठी तिने ईमेल आयडीदेखील दिला होता. तर रियानचे तिने आभार मानले. ‘आपल्या कुटुंबासाठी तू जीव धोक्यात घातलास, तू कायम हिरो राहशील’ असं म्हणत लेडी गागाने त्याचे आभार मानले.
View this post on Instagram
अखेर लेडी गागाच्या चोरीला गेलेल्या श्वानांचा तपास लागला आहे. एका महिलेनं लेडी गागाच्या दोन्ही श्वानांना पोलिसांकडे सोपवलं. लेडी गागाच्या मॅनेजरने लगेचच पोलिस स्टेशन गाठतं श्वानांचा ताबा घेतला. हे दोन्ही श्वान या महिलेकडे कसे आले याचा तपास अद्याप लागला नसला तरी श्वान सापडल्यानं लेडी गागाची चिंता दूर झालीय. तर श्वानांचा तपास लावणाऱ्या महिलेला तब्बल 5 लाख डॉलर्स म्हणजेच 3 करोड 50 लाख रुपयांचं इनाम मिळालं आहे.
कोजी आणि गुस्ताव यांचा शोध लागल्याचा आनंद लेडी गागाने व्यक्त केला आहे. लेडी गागाचे दोन्ही श्वान हे फ्रेचं बुलडॉग जातीचे आहेत. या श्वानांची किंमत लाखोंच्या घरात असते. मात्र नेमकं कोणत्या कारणासाठी या श्वानांचं अपहरण करण्यात आलं होतं याचा अद्याप शोध लागलेला नाही. असं असंल तरी या श्वानांचा शोध लावणाऱ्याचं नशीब मात्र झळकलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 27, 2021 12:28 pm