‘लगे रहो मुन्ना भाई’ हा अभिनेता संजय दत्तच्या करिअरमधील एक सुपरहिट चित्रपट आहे. या चित्रपटची कथा महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. या चित्रपटात संजय दत्तला चक्क गांधी दिसू लागतात, असं दाखवण्यात आलं आहे. मात्र खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील त्याला गांधी दिसतात का? असा प्रश्न त्याला शाहरुख खानने विचारला होता. या प्रश्नावर संजयने दिलेलं उत्तर ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल…

सोशल मीडियावर सध्या एक थ्रोबॅक व्हिडीओ चर्चेत आहे. हा व्हिडीओ २०१०मध्ये झालेल्या फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यामधील आहे. शाहरुख खानने या सोहळ्यात “तुला खऱ्या आयुष्यात देखील महात्मा गांधी दिसतात का?” असा प्रश्न संजय दत्तला विचारला होता. या प्रश्नावर तो म्हणाला, “हो मला खऱ्या आयुष्यात देखील गांधी दिसतात. हे बघ गांधी इथेच बसले आहेत.” त्याचं हे उत्तर ऐकून प्रेक्षकांनी एकच हास्यकल्लोळ केला. गांधींबाबत प्रश्न विचारुन शाहरुखने संजय दत्तची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चकित करणारं उत्तर देऊन उलट संजयनेच शाहरुखची फिरकी घेतली.

अवश्य पाहा – धनुष उठा प्रहार कर; करोना पॉझिटिव्ह अभिषेकला बिग बींनी दिलं प्रोत्साहन

‘लगे रहो मुन्ना भाई’ हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं होतं. या चित्रपटात संजय दत्त व्यतिरिक्त अर्शद वारसी याने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. दोघांची मुन्ना व सर्किट ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. शिवाय दिलिप प्रभावळकर यांनी महात्मा गांधी ही व्यक्तिरेखा साकारली होती. यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.