करोनाच्या दहशतीमुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही प्रमाणात जण करोनातून बरे होत आहेत. पण असे असले तरी सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. राज्यात देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत लढाईचा सामना करण्यासाठी एखादी आर्थिक मदत म्हणा किंवा धान्य, अत्यावश्यक सेवेबाबतची मदत करण्यास इंडस्ट्रीतील कलाकार मंडळींनी धाव घेतली आहे.

प्रत्येक कलाकार आपल्याला जमेल त्या पद्धतीने आणि योग्य काळजीपूर्वक मार्गाने या लढ्यात सामील झाला आहे. असाच या लढ्यातील खारीचा वाटा उचलला आहे ‘लागीर झालं जी फेम’ निखिल चव्हाण याने. या मालिकेत साकारलेली निखिलची भूमिका ही देशाप्रती योगदानाची होतीच मात्र आज ओढावलेल्या देशावरील करोनाच्या संकटाला सामोरे जात एक योगदानच निखिल करत आहे.

अभिनेता निखिल चव्हाण आणि शेवाळेवाडीचे उपसरपंच अमित (अण्णा) पवार संचालित ‘राजे क्लब’च्या माध्यमातून गरजू कुटुंबाना जणू एक आशेचा किरणच दाखविला आहे. आज पर्यत जवळपास १७० कुटुंबाना या क्लबच्या माध्यमातून अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. इथवरच न थांबता आपले हात जेवढे दूर जाऊ शकतील तेवढी मदत करण्याचे या राजे क्लब ह्या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी ठरविले आहे. निखिल चव्हाण आणि अमित पवार ह्यांची ही गरजू व्यक्तींसाठी असलेली मदत आशीर्वादाची ओंजळ भरण्यात नक्कीच उपयोगी राहील.