तेजश्री गायकवाड

यंदाचे हे वर्ष डिजिटल वर्ष म्हणून ओळखले जाते आहे. जी गोष्ट आपण रोज उठून प्रत्यक्ष करत होतो तिचे रूपडे पाठच्या वर्षांने पूर्णत: बदलले. अगदी सगळ्याच गोष्टी आपण आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने करू लागलो. ऑफिसची कामे, मीटिंग, शिक्षण, वेगवेगळे कार्यक्रम आभासी पद्धतीनेच होऊ लागले आणि आता ही पद्धत जणू अंगवळणी पडली आहे. असे असले तरी सरकारने घालून दिलेले सगळे नियम पाळून आपण आपले बँक टू नॉर्मल आयुष्याकडे वळलो. याचेच एक उदाहरण म्हणजे १६ तारखेपासून मुंबईमध्ये सुरू झालेला ‘लॅक्मे फॅशन वीक’.

यंदा लॅक्मे फॅशन वीक ‘फिजिटल’ पद्धतीने होत आहे. न्यू नॉर्मल आणि ओल्ड नॉर्मल यांचे कॉम्बिनेशन करत या वेळी काही प्रमाणात रन-वे वॉक्स तर काही व्हर्च्युअल शोज अशा पद्धतीने वीक पार पडत आहे. ‘आरआयएसई वर्ल्डवाईड’ आणि ‘फॅशन डिझाइन काऊन्सिल ऑफ इंडिया’ हे देखील यंदा ‘लॅक्मे’बरोबर फॅशन वीकमध्ये एकत्र आलेले आहेत. करोनाचा प्रभाव प्रत्येक इंडस्ट्रीवर झाला. अर्थात तो प्रभाव फॅशन इंडस्ट्रीवरही झाला. सगळीच आर्थिक गणिते फिसकटली. ‘लॅक्मे फॅशन वीक’सारख्या मोठय़ा सोहळ्याला देश-विदेशातील अनेक उद्योगपती, वेगवेगळे ब्रँण्ड, ग्राहक, मनोरंजन क्षेत्रात काम करणारे कलाकार, प्रसारमाध्यमाची रेलचेल असते. यामुळे आपल्या भारतीय फॅशन इंडस्ट्रीचे नाव मोठे होते आणि त्यामुळे साहजिकच याचा परिणाम या इंडस्ट्रीच्या आर्थिक गोष्टींवरही होतो. करोनामुळे मागच्या वर्षीचा ‘लॅक्मे फॅशन वीक’ व्हर्च्युअल पद्धतीनेच झाला. परंतु यंदाच्या संपूर्ण फॅशन वीकमधले ६ डिझायनरच कलेक्शन ‘ड्राइव्ह इन’ या पद्धतीने निवडक लोकांना पाहण्याची संधी मिळत आहे. ड्राइव्ह इन ही संकल्पना ‘ड्राइव्ह इन थेटर’ किंवा ‘ड्राइव्ह इन सिनेमा’ या नावाने विदेशात प्रसिद्ध आहे. आपल्याकडे अशा पद्धतीने एखादा फॅशन सोहळा सादर होण्याची तशी पहिलीच वेळ आहे. या संकल्पनेमध्ये मोठी स्क्रीन, प्रोजेक्शन बूथ आणि येणाऱ्या पाहुण्यांसाठी पार्किंग एरिया असतो. अशाच पद्धतीच्या अरेंजमेंटसह आणि मोठय़ा रनवेसह हे प्रेझेंटेशन पार पडते. निवडक पाहुणे आपापल्या गाडीमध्ये बसून पूर्ण डिझायनरच प्रेझेंटेशन प्रत्यक्षरीत्या बघू शकतात. या निमित्ताने दरवेळी शोजच्या वेळी होणारी बॅक स्टेज धावपळ मात्र तशीच आहे. उलट बंदिस्त खोलीत होणाऱ्या शोपेक्षा अशा पद्धतीने होणाऱ्या खुल्या शोला प्रत्येक गोष्टीची अधिक काळजी घेताना बॅक स्टेजचा समूह दिसत आहे. या नावीन्यपूर्ण प्रयोगामुळे संपूर्णपणे नाही तर काही प्रेझेंटेशनचा लाभ तरी प्रत्यक्षरीत्या लोकांना घेता येत आहे. यामुळे निश्चितच फॅशन इंडस्ट्रीला उभारी घेण्यासाठी फायदा होणार आहे.

खरे तर हा सोहळा म्हणजे फॅशन डिझायनर्ससाठीच नाही तर बॉलीवूड सेलिब्रिटींसाठीही फॅशन आणि ग्लॅमरची नांदी असते. नामांकित फॅशन डिझायनर्सची कपडे घालून टेचात रॅम्पवर येणारे बॉलीवूड अभिनेते-अभिनेत्री ही या शोची खरी ओळख आहे. मात्र या वर्षी सेलिब्रिटींचे प्रमाण कमी दिसत आहे. ‘शो स्टॉपर’ म्हणून आणि फक्त आपल्या आवडत्या डिझायनरला सपोर्ट करण्यासाठी तरी सेलिब्रिटीची शोला उपस्थिति असते. परंतु यंदा या सेलिब्रिटींनी ‘लॅक्मे फॅशन वीक’ला व्हच्र्युअलीच हजेरी किंवा सपोर्ट करताना दिसत आहे. आपल्या एखाद्या आवडत्या डिझायनरसाठी छानशी पोस्ट किंवा व्हिडीओ पोस्ट करून सपोर्ट के ला जात आहे.

एकंदरीत सरकारच्या नियमांचे पालन करत आणि ‘ड्राइव्ह इन’सारख्या नवीन प्रयोगांसह यंदाचा ‘फिजिटल’ पद्धतीने ‘लॅक्मे फॅशन वीक २०२१’ साजरा होत आहे.