ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी त्यांची सुमारे एक एकर जागा चित्रपट सृष्टीतील कलाकारांसाठी वृद्धाश्रम बांधण्यासाठी चित्रपट महामंडळाकडे देणार असल्याची घोषणा बुधवारी केली. पुणे जवळील नाणेगाव येथे ही जागा आहे.

या जागेची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये इतके असून, ही जागा महामंडळाला देण्याबाबत टाळेबंदी उठल्यानंतर करार होणार आहे, असे अशी माहिती अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कसदार अभिनयाबरोबरच सामाजिक बांधिलकीचे भान सातत्याने जपले आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी एक लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला होता. त्याची त्यांनी कसलीही चर्चा केली नव्हती. उलट, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून विक्रम गोखले धनादेश देत असल्याचे छायाचित्र व त्याची माहिती प्रसिद्ध करून मदतीबद्दल आभार मानले होते.

त्यांचा दानशूरपणा आता कलाकारांच्या वृद्धाश्रम बांधण्याच्या संकल्पनेतूनही दिसत आहे. नाणेगाव येथे एक एकर जागा त्यांनी महामंडळाला देणगी म्हणून देण्याची घोषणा आज केली आहे. ‘या जागेवर महामंडळाच्या निधीतून वृद्धाश्रम बांधले जाईल. यामुळे कलाकारांचे वृद्धापकाळात होणारे हाल थांबतील आणि त्यांची निवासाची शाश्वत सोय होईल.’ असे मेघराज राजे भोसले राजेभोसले यांनी सांगितले.