लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप असलेल्या साजिद खानच्या स्वभावाची पूर्वकल्पना मला लारानं खूप आधी दिली होती असा खुलासा टेनिसपटू महेश भूपती यानं एका कार्यक्रमादरम्यान केला. लारा साजिदसोबत ‘हाऊसफुल’चं चित्रिकरण करत होती तेव्हा आम्ही दोघंही एकमेकांना डेट करत होतो. यादरम्यान एका भेटीत साजिदचं महिला कलाकारांप्रती असलेलं वर्तन खूपच असभ्य असल्याचं लारानं मला सांगितलं होतं असं भूपती म्हणाला.
एका कार्यक्रमात ‘मी टु’ या मोहिमेविषयी बोलताना भूपतीनं पत्नी लाराला आलेला अनुभव सांगितला. ‘२०१० सालची गोष्ट होती. मी आणि लारा एकमेकांना डेट करत होतो. लारा ही तेव्हा साजिदच्या हाऊसफुलमध्ये काम करत होती. लंडनमध्ये याचं चित्रिकरण सुरू होतं. त्यावेळी लारानं मला साजिदच्या असभ्य आणि अश्लील वागण्याची कल्पना दिली. साजिद हाऊसफुलमधल्या तिच्या सहकलाकार अभिनेत्रींसोबत असभ्य वर्तन करतो हे तिनं मला सांगितलं.
एके दिवशी लाराची एक हेअरड्रेसर मैत्रीण आली. तिनंही साजिदबद्दल माझ्याकडे तक्रार केली. साजिदचं अभिनेत्रींप्रती असणारं वर्तन हे खूपच असभ्य असल्याचं तिचीही तक्रार होती. मी लारा आणि तिच्या मैत्रीणीचं बोलणं ऐकून घेतलं. साजिद असभ्य वर्तन करतो कारण तुम्ही ते सहन करता. तुम्ही त्याच्याविरोधात आवाज उठवायला पाहिजे. नाहीतर तुम्हीदेखील या प्रकरणात तितक्याच दोषी होता हे मी लाराला त्यावेळीही सांगितलं होतं. तिला ते पटलंही होतं असंही भूपती म्हणाला.
लारानं लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप असलेल्या एका दिग्दर्शकांसोबत काम करायला नकार दिला, तिनं ठोस भूमिका घेतली याचा मला अभिमान आहे. महिलांनी त्याच्या सन्मानासाठी लढलंच पाहिजे असं म्हणत महेशनं मी टु मोहिमेला पाठिंबा दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 11:29 am