बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीसह त्याचे चाहते हळहळ व्यक्त करीत आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही सुशांत राजपूतच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी सुशांतच्या अभिनयाबद्दल आपल्या भावना ट्विटमधून व्यक्त केल्या आहेत.

सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का दिला. त्याच्याविषयीच्या भावना कलाकार व्यक्त करीत असून, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही ट्विट करून सुशांतबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला. आमची कधी भेट झाली नव्हती, पण त्याने धोनी चित्रपटात खुप सुंदर अभिनय केला होता. जो मी कधीच विसरू शकत नाही. मी त्याला श्रद्धांजली अर्पण करते. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो,” असं लता मंगेशकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लता मंगेशकर यांच्याबरोबरच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, समीक्षक, निर्माते, दिग्दर्शक यांनी सुशांतबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुशांतनं २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं होतं.