गानकोकीळा लता मंगेशकर यांना २८ दिवसांच्या उपचारानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना १२ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या सोशल मीडियावर त्यांचा रुग्णालयातील एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत लतादीदी खूपच अशक्त दिसत असून त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी असे कमेंट्स चाहते करत आहेत.

लतादीद यांना १२ नोव्हेंबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत लतादीदींसोबत ब्रीच कँडी रुग्णालयातील नर्सेस पाहायला मिळत आहेत. यांनीच गेल्या २८ दिवसांत लतादीदींची काळजी घेतली होती.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर लतादीदींनी ट्विटसुद्धा केलं. “नमस्कार. गेल्या २८ दिवसांपासून मी ब्रीच कँडी रूग्णालयामध्ये होते. मला न्युमोनिया झाला होता. मी पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच घरी जावं, अशी डॉक्टरांची इच्छा होती. आज मी घरी आले आहे. ईश्वर, आईवडिलांचे आशिर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम यांमुळे मी आता ठीक आहे. मी तुम्हा सगळ्यांची मनापासून आभारी आहे. ब्रीच कँडीमधील डॉक्टर खरंच देवदूत आहे. तेथील सर्व कर्मचारी खूपच चांगले आहेत”, असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं.