देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या अमर शहिदांना सलाम म्हणून गानकोकिळा लता मंगेशकर यांनी २६ जानेवारी १९६३ रोजी  ‘ऐ मेरे वतन के लोगों..’ हे अजरामर गीत नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायले. हे गाणे लतादीदी येत्या २७ जानेवारीला महालक्ष्मी रेसकोर्सवर पुन्हा गाणार आहेत. मात्र या वेळी लतादीदींसोबत सुमारे एक लाख गायक, कलाकार हे गीत सामूहिकरीत्या गाणार आहेत.  
लतादीदींच्या अजरामर गायनाला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून लोढा फौंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रेसकोर्सवर सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदी यांच्या हस्ते लतादीदींचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती लोढा फौंडेशनच्या शहीद गौरव समितीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी १९६२ मध्ये चीनबरोबर झालेल्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांनाही खास आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय परमवीर चक्र, शौर्य सन्मान प्राप्त झालेल्या शंभरहून अधिक शहिदांच्या कुटुंबीयांचा तसेच वीर सैनिकांचा या सोहळ्यात सत्कार करण्यात येणार असल्याचे समितीच्या सचिव अनुराधा गोरे यांनी सांगितले.