गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. माझी प्रकृती ठीक असून मी घरी आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. मात्र या सर्व चर्चा अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘नमस्कार, माझ्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरत आहेत. पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. माझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे,’ असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  मात्र लतादीदींनी स्पष्टीकरण दिल्याने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

वाचा : यश मिळाल्यावर त्यांचा अहंकार वाढतो; करणने आयुषमान, विकी कौशल, राजकुमारला सुनावले

काही दिवसांपूर्वी त्या संगीतातून निवृत्ती घेणार असल्याच्याही चर्चा होत्या. त्यावर गाणे हा माझा श्वास आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत गातच राहणार त्यामुळे निवृत्तीचा प्रश्न येतोच कुठे?, असे उत्तर त्यांनी दिले होते.  काही रिकामटेकड्या माणसांनी माझे गाणे आणि त्यासोबत माझ्या निवृत्तीचा संदेश सोशल मीडियावर पसरवला त्यामुळे हे घडते आहे, असेही त्यांनी म्हटले होते.