व्हॉट्स अॅप, फेसबुक, ट्विटरचा जमाना असताना आजकाल सहसा कोणी पत्र लिहिताना दिसत नाही. पत्र लिहिणं जणू आता इतिहासजमाच होत चालला आहे. सोशल मीडियाची क्रेझ अनेकांना असतानाही जर कोणी स्वत:च्या हस्ताक्षरात एखाद्याला पत्र लिहित असेल, तर त्याचंही फार अप्रूप वाटतं. त्यातच ती व्यक्ती खास असली की आनंदाचा पारावारच राहत नाही. असंच काहीसं घडलंय अभिनेत्री जुही चावलासोबत. जुहीला अचानक एक पत्र मिळालं आणि त्या पत्रावरील नाव अजून तिला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.

या पत्राचा फोटो तिने ट्विटरवर शेअर केला आहे. जुहीला हे पत्र लिहिलं आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी. हे पत्र मिळाल्यावर तिला जो आनंद झाला त्याचा अंदाज फोटोच्या कॅप्शनमधूनच येत आहे. ‘सकाळीच माझ्या हातात हे पत्र पडलं. हे पत्र पाहिल्यावर माझा आनंद मी कसा व्यक्त करू हेच समजत नाही आहे. खुद्द लतादीदींनी माझ्यासाठी हे पत्र लिहिलं आहे,’ या शब्दांत जुहीने तिचा आनंद व्यक्त केला.

Video : राज कपूर यांच्या गाण्यावर माहिरा खानचा अनोखा अंदाज

या पत्रातून लता मंगेशकर यांनी जुही चावलाची स्तुती केली आहे. त्यांनी लिहिलं की, ‘देवाने तुला जितकं सुंदर बनवलं आहे, त्याहीपेक्षा सुंदर तुझं मन बनवलंय. नेहमी खूश राहा!’ दिवसाची सुरुवात जर गानसम्राज्ञीकडून मिळालेल्या पत्राने होत असेल तर कोणाला आनंद होणार नाही?