प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानीचं आनंद पिरामल बरोबर बुधवारी धुमधडाक्यात लग्न पार पडलं. या लग्नसोहळयात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अनोख्या पद्धतीने वधू-वराला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजात गायत्री मंत्र, गणेश स्तुती आणि नवविवाहित जोडप्यासाठी एक विशेष संदेश रेकॉर्ड करुन पाठवला होता.

१२ डिसेंबरला लग्नाचे विधी सुरु असताना लता मंगेशकरांच्या आवाजातील गायत्री मंत्राचे पठण प्रस्तुत करण्यात आले. लतादीदींच्या आवाजातील गायत्री मंत्राच्या पठणाने या लग्नसोहळयाची शोभा आणखी वाढली. हिंदू वेदीक विधी आणि गुजराती परंपरेनुसार हे लग्न पार पाडले. गायत्री मंत्राचे पठण सुरु होण्याआधी प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी उपस्थित पाहुण्यांना त्याचे महत्व समजावून सांगितले.

विवाहाचा खर्च 724 कोटी नाही फक्त 100 कोटी
विवाहाच्या आधीच्या जयपूरमधील सोहळ्यावर व विवाहावर एकूण मिळून 724 कोटी रुपयांचा खर्च झाल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्या. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीजमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा खूपच फुगवलेला आहे. सूत्रांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना सगळा खर्च गृहीत धरला तर या विवाहावर झालेला एकूण खर्च 100 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले. अंबानी कुटुंबीयांचं मुंबईतील निवासस्थान ‘अँटीलिया’ बंगल्यात अगदी थाटामाटात हे लग्न पार पडलं. या सोहळ्यासाठी बॉलिवूडपासून राजकारण आणि क्रीडाविश्वापासून ते उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली.