बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिवंगत कादर खान यांच्या सगळ्यात मोठ्या मुलाचे निधन झाले आहे. अब्दुल कुद्दुस असे त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव होते. अब्दुल कॅनडात स्थित असून तिथेच विमानतळावर सुरक्षा रश्रकाचे काम करत होते.

अब्दुल कुद्दुस यांच्या निधनाची बातमी बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवरून एक फोटो पोस्ट करत दिली आहे. कादर खान यांनी अजरा खान यांच्याशी लग्न केले होते. त्यांना तीन मुलं असुन सरफराज खान, अब्दुल कुद्दुस खान आणि शहनवाज खान अशी त्यांनी नावं आहेत. सरफराज आणि शहनवाज हे दोघे ही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. सरफराजन यांनी अभिनेता असण्यासोबत निर्माता म्हणून देखील काम केले आहे. सरफराज यांनी २००३ मध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘तेरे नाम’ या चित्रपटात काम केले होते. त्यांनी त्या चित्रपटात सलमानचा जिवलग मित्र असलमची भूमिका साकारली होती. तर २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वॉन्टेड’ चित्रपटात सुद्धा ते सलमानच्या मित्राच्या भूमिकेत दिसले होते.

२०१२मध्ये वडिलांसोबत सरफराज आणि शहनवाज यांनी ‘कल के कलाकार इंटरनॅशनल थिएटरची’ सुरूवात केली. कादर खान यांचे संपूर्ण कुटूंब हे कॅनडात स्थित आहे. अब्दुल कुद्दुस प्रमाणे शहनवाजने देखील त्याच्या जीवनातील जास्त वेळ हा कॅनडात व्यतीत केला आहे. तर २१ डिसेंबर २०१८ मध्ये ८१ वर्षांच्या कादर खान यांचे कॅनडामध्ये निधन झाले. कादर खान यांनी बॉलिवूडमध्ये ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.