News Flash

‘धर्मांतराला विरोध केल्याने आमचं नातं संपुष्टात आलं’; दिवंगत वाजिद खानच्या पत्नीचा खुलासा

वाजिद खान यांच्या निधनानंतरही त्यांच्या कुटुंबीयांकडून छळ सुरू असल्याचं त्यांनी लिहिलं.

दिवंगत संगीतकार वाजिद खान यांची पत्नी कमलरुख खान यांनी सोशल मीडियावर आंतरजातीय विवाहासंबंधी एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. लग्नाच्या आधी १० वर्षांपासून वाजिद व कमलरुख रिलेशनशिपमध्ये होते. लग्नानंतर त्यांच्या जीवनात झालेले बदल आणि ही पोस्ट लिहिण्यामागचं खरं कारण त्यांनी सविस्तरपणे सांगितलं.

‘मी पारशी आहे आणि ते मुस्लीम होते. कॉलेजपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. विशेष विवाह कायद्याअंतर्गत आमचं लग्न झालं. त्यामुळे सध्या धर्म परिवर्तन विधेयकासंबंधी सुरु असलेली चर्चा माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. मला आंतरजातीय विवाहाबद्दलचा माझा अनुभव सांगायचा आहे. आजच्या युगातही एखाद्या स्त्रीला धर्माच्या नावाखाली भेदभाव आणि दु:ख सहन करावं लागतं, ही लज्जास्पद आणि डोळ्यांत अंजन घालणारी गोष्ट आहे’, असं त्यांनी लिहिलं.

लग्नानंतर झालेल्या बदलाबद्दल त्यांनी पुढे लिहिलं, ‘नितीमूल्यांच्या बाबतीत लोकशाहीच्या वातावरणात माझी जडणघडण झाली. विचारांच्या स्वातंत्र्यास प्रोत्साहित केलं गेलं आणि विचार करून केलेली चर्चा मान्य होती. सर्व स्तरांवरील शिक्षणास प्रोत्साहित केलं गेलं. मात्र लग्नानंतर हेच स्वातंत्र्य, शिक्षण आणि लोकशाही मूल्यव्यवस्था ही माझ्या पतीच्या कुटुंबासाठी सर्वांत मोठी समस्या होती. त्यांना एक सुशिक्षित, स्वत:ची वेगळी विचारसरणी असलेली, स्वतंत्र स्त्री नको होती. धर्मांतर करण्याला माझा विरोध होता आणि त्यामुळे पती-पत्नी म्हणून आमचं नातं संपुष्टात आलं. धर्मांतर करून त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी झुकण्यास माझा स्वाभिमान नकार देत होता.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Kamalrukh Kahn (@kamalrukhkhan)

या वैचारिक वादामुळे वाजिद खान यांच्या कुटुंबातून त्यांना बाहेर काढलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. धर्मांतर नाही केला तर घटस्फोटाचीही भीती दाखवली गेली, असं त्यांनी लिहिलं. ‘मी उद्ध्वस्त झाले होते, माझा विश्वासघात झाला होता, पण माझ्या मुलांनी माझी साथ दिली’, अशा शब्दांत त्यांनी दु:ख व्यक्त केलं.

वाजिद खान यांच्या अकाली निधनानंतरही त्यांच्या कुटुंबीयांकडून अजूनही छळ सुरू असल्याचं त्यांनी पुढे लिहिलं. “वाजिद अत्यंत प्रतिभावान संगीतकार होता. पण त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या धार्मिक कट्टरतेमुळे आम्ही कधीच एक चांगलं कुटुंब बनू शकलो नाही. आज त्याच्या निधनानंतरही, त्याच्या कुटुंबीयांकडून माझा छळ सुरू आहे. माझ्या मुलांचे हक्क मला मिळावेत यासाठी मी लढा देतेय आणि त्याला ते विरोध करतायत. धर्मांतर न केल्यामुळे माझ्यावरील त्यांचा द्वेष इतका वाढला आहे की आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्यांच्यात काही बदल झाले नाही.”

संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी या पोस्टच्या अखेरीस केली. ‘आंतरजातीय लग्नानंतर माझ्यासारख्या स्त्रियांचा संघर्ष कमी व्हावा. मतभेद स्वीकार करण्यासाठी धर्म असावा, कुटुंबाचं विभाजन करण्यासाठी नव्हे. सर्व धर्माचे मार्ग हे ईश्वराकडेच जातात. जगा आणि जगू द्या, हा एकच धर्म आपण सर्वांनी पाळला पाहिजे’, असं म्हणत त्यांनी पोस्टचा शेवट केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 9:00 pm

Web Title: late wajid khan wife kamalrukh on life in an inter caste marriage ssv 92
Next Stories
1 कंगना रणौतचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रत्युत्तर, म्हणाली…
2 ड्रग्ज प्रकरणामुळे भारती सिंहची होणार ‘द कपिल शर्मा शो’मधून हकालपट्टी?
3 VIDEO : चहलची होणारी पत्नी धनश्रीचा अफलातून डान्स पाहिलात का?
Just Now!
X