रेश्मा राईकवार

लेथ जोशी

बदल हा कायम असतो असे म्हटले जाते. पण कोणी कशासाठी, किती वेगाने आणि काय – काय बदलायचे याचे ठोकताळे नियम म्हणून नाही लावता येत. आणि आजूबाजूच्या बदलाचा एखाद्याला ठावच लागत नसेल तर.. त्या बदलाचा भागच होता येत नसेल तर.. काय? ती व्यक्तीच मोडीत निघते? एखादी वस्तू बिनकामाची झाली आहे म्हणून अडगळीत टाकता येते पण माणसांच्याही बाबतीत हेच होतं का? अशी अनेक माणसे आज अडगळीत हरवली आहेत. गिरण्या जाऊन कंपन्या आल्या तेव्हा अशी अनेक माणसे जणू काळाचा एक सोनेरी तुकडा पाचोळ्यासारखा नामशेष झाला. आताही तंत्राच्या वेगात यंत्रच हरवत चालली आहेत तिथे या यंत्रावर काम करणाऱ्या माणसाचे काय होत असेल हा विचार करायला वेळ कोणाला आहे.. तंत्रामुळे पालापाचोळ्यागत झालेल्या यंत्राची आणि त्याच्याशी नाते जोडलेल्या माणूस नामक यंत्राची गुजगोष्ट ‘लेथ जोशी’च्या निमित्ताने अनुभवायला मिळाली आहे.

मंगेश जोशी लिखित आणि दिग्दर्शित ‘लेथ जोशी’ ही खरोखरच मनीची गुजगोष्ट आहे. संपत चाललेल्या यंत्राची आणि त्याच्या मालकाचीही. असे म्हणण्याचे कारण चित्रपटात या दोन्ही गोष्टी क्वचितच बोलतात पण त्यांच्या असण्यातून आणि आजूबाजूचा बदल फक्त अबोल डोळ्यांनी टिपत अव्यक्तच राहणाऱ्या लेथ जोशी नामक गृहस्थाच्या मनातून हा सल प्रेक्षकांच्या मनापर्यंत झिरपतो. त्याचे नाव ‘लेथ जोशी’ नाही तर त्याच्यातील कलाकाराची ओळख लेथ जोशी आहे. इतर कोणत्याही सर्वसामान्यांप्रमाणे लेथ मशीनवर धातूला हवा तसा आकार देणाऱ्या विजय जोशी यांची ही कथा आहे. आपण ज्या यंत्रावर काम करतो त्याला देव मानून मोठय़ा निष्ठेने आणि एखाद्या कलाकाराच्या नजाकतीने आपले काम करणारे विजय जोशी (चित्तरंजन गिरी). एके दिवशी त्यांच्या हातात पगार टेकवून त्यांना कामच संपल्याचे सांगितले जाते. एकाएकी आपल्या हातची कला कोणी काढून घ्यावी आणि ते हात निर्जीव व्हावेत, इतक्या सुन्न मनाने त्यांचा घरीदारी वावर सुरू होतो. पण त्यांचे हे जग बदलले आहे याची सुतराम कल्पनाही त्यांच्या पत्नीला (अश्विनी गिरी) आणि मुलाला (ओम भुतकर) येत नाही. डोळ्याने दिसत नसले तरी कानाने मालिका ऐकणारी, चाचपडणाऱ्या हातांनी रिमोटची बटणे दाबत आपल्याला हवी ती मालिका लावणारी त्यांची आई, घरोघरी जेवणाच्या ऑर्डर्स घेऊन पैसे कमवणारी आणि आपल्या कामामुळे दिसलेल्या नव्या जगाप्रमाणे सहज जुळवून घेणारी जोशींची बायको आणि कॉम्प्युटरपासून सगळ्या यंत्रांचे तांत्रिक काम लीलया करणारा त्यांचा मुलगा या तिघांनीही आपल्याभोवतालीचा बदल वेगाने आत्मसात केला आहे. त्या बदलांशी जुळवून घेत ते पुढे चालले आहेत. मात्र हे सगळे अनिमिष नजरांनी पाहणाऱ्या जोशींना यातली कुठलीच गोष्ट लक्षात येत नाही. ते त्यांच्या हरवलेल्या लेथच्या मागे आहेत. एका क्षणी आपल्या कलेच्या शोधात असलेल्या या कलाकाराला त्या सत्याची जाणीव होते..

‘लेथ जोशी’ हा चित्रातून बोलणारा अप्रतिम भावपट आहे. प्रत्येक फ्रेम आणि फ्रेममधून चित्रपट बोलत राहतो. अगदी निर्विकार चेहऱ्याच्या जोशींच्या डोळ्यातूनही तो बोलत राहतो. नुसतीच गोष्ट सांगण्यापेक्षा प्रतीकात्मक मांडणीतून त्या भावना पाहणाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. लेथचे आणि जोशींचे अद्वैत पडद्यावर रंगवताना त्या अनुषंगाने तंत्रज्ञानाच्या वेगात हरवत चाललेल्या अनेक गोष्टी दिग्दर्शक सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचवतो. तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत यंत्रच हरलेली नाहीत तर माणुसकीही हरली आहे. लेथवरच्या सफाईदार हातांनी उत्तम काम केले आहे की नाही यापेक्षाही लेथ ऑटोमॅटिक मशीनप्रमाणे हजारोंच्या संख्येत ‘जॉब’ करून देईल का?, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. आणि जिथे तंत्रदृष्टय़ा प्रगत यंत्राकडून संख्यात्मक काम मिळते आहे म्हटल्यावर तिथे जुन्या यंत्रांवर गुणात्मक काम करणाऱ्या हातांना काहीच ‘अर्थ’ उरत नाही. या आर्थिक गणितांच्या मागे धावणाऱ्यांना कोणाच्याच मनाचे हिशोब करायला वेळ नाही. आजारी आजीची देवदर्शनाची इच्छा लॅपटॉपवर पूर्ण करणारा नातू तिच्या त्यामागच्या भावनांपर्यंत पोहोचतच नाही. आजी मात्र तेच अंतिम दर्शन आहे हे मनाला समजावत प्राण सोडते. घरातल्या माणसांची ही अवस्था आहे तिथे कामगारांचा विचार मालकांकडून होईल, हा विचारच अतिशयोक्ती ठरू पाहतो आहे. मंगेश जोशी यांनी स्वत: ही कथा लिहिली आहे आणि दिग्दर्शनही केले असल्याने त्यांना नेमके काय सांगायचे आहे यातली स्पष्टता चित्रपटांत ठळकपणे दिसते. लेथ जोशींच्या भूमिकेत चित्तरंजन गिरी यांची झालेली निवड त्यांनी सार्थ ठरवली आहे. त्यांच्याबरोबर अश्विनी गिरी, ओम भूतकर, अजित अभ्यंकर या सगळ्याच कलाकारांनी अत्यंत सहजपणे आपापल्या व्यक्तिरेखांमधून ही गोष्ट पडद्यावर रंगतदार केली आहे. सत्यजित श्रीराम यांच्या कॅ मेऱ्याचाही उल्लेख करायलाच हवा. अवकाशातील प्रत्येक गोष्टीचा वापर करत कथा जिवंत करण्याची किमया त्यांच्या कॅमेऱ्याने साधली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही दिग्दर्शकाची गोष्ट आहे आणि त्याने ती अगदी मनापासून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. त्याच्या नजरेतून पाहिलेल्या, जाणवलेल्या अनेक गोष्टी या चित्रपटाच्या कित्येक फ्रेम्समधून जिवंत झाल्या आहेत आणि ती चित्रे तुमच्या मनावर कोरली जातील यात शंका नाही. कारण ती तुमच्या-आमच्या मनातली गोष्ट आहे जी पहिल्यांदाच इतक्या ठळकपणे जोशींच्या निमित्ताने आपल्यासमोर उभी ठाकली आहे. त्यातून नेमके का बघायचे, याचे उत्तर शेवटी आपण कोणता चष्मा डोळ्यावर चढवतो त्यावर अवलंबून आहे.

’ दिग्दर्शक – मंगेश जोशी

’ कलाकार – चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, ओम भूतकर, अजित अभ्यंकर, सेवा चौहान.