22 March 2019

News Flash

Video : आशययुक्त ‘बोगदा’ चा टीझर पाहिलात का?

येत्या ७ सप्टेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या बौद्धीक आणि आशयघन चित्रपटांची नांदी होताना दिसत आहे. प्रत्येक दिग्दर्शक आपल्यामधील सृजनशीलतेला वाव देण्याचा प्रयत्न करत असून वेगवेगळ्या आशयाच्या चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बोगदा या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी दिग्दर्शित ‘बोगदा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या चित्रपटाचा आशय आई आणि मुलीच्या नातेसंबधावर आधारित आहे. माय-लेकीचे ऋणानुबंध मांडणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरमध्येही त्यांचे नाते दिसून येते. शिवाय, कमी शब्दात खूप काही सांगून जाणारा हा टीझर पाहणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेतो.

‘बोगदा’ हे शीर्षक देखील विचार करण्यासारखे असून, या चित्रपटातील पात्रांचे संवादही प्रेक्षकांना बरेच काही सांगून जातील असे आहे. आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणाऱ्या या स्त्रीप्रधान चित्रपटाचे संवाद आणि पटकथा लेखन दिग्दर्शिका निशिता केणी यांनीच केले असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांच्यासोबत त्यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील संभाळली आहे.

First Published on August 10, 2018 2:05 pm

Web Title: launches bogda teaser marathi movie mrunmayi deshpande