झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित एक हॉलिवूडपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘स्वॉर्ड्स अँड सेप्टर्स’ असं या चित्रपटाचं नाव आहे. यामध्ये ब्रिटीश कलाकारांसोबतच काही भारतीय कलाकारसुद्धा भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे या हॉलिवूडपटात प्रेक्षकांना लावणीचा ठसका पाहायला मिळणार आहे. मुंबईतल्या आदेश वैद्यने याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे.

कुठल्याही प्रकारचं नृत्याचं प्रशिक्षण न घेतलेल्या आदेशने स्वकर्तृत्वावर नृत्य दिग्दर्शन क्षेत्रात आपला ठसा उमटवला. सुरुवातीला त्याने सहायक नृत्य दिग्दर्शक म्हणून काही ठिकाणी काम केले. त्यानंतर ‘धर्मकन्या’ या मालिकेच्या शीर्षकगीतापासून त्याचा स्वतंत्र नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रवास सुरु झाला. ‘पुढचं पाऊल’, ‘रुंजी’, ‘लगोरी’, ‘येक नंबर’, ‘विठू माऊली’ अशा अनेक मालिकांच्या शीर्षकगीतांसाठी आणि सुमारे २५ चित्रपटांसाठी आदेशनं नृत्य दिग्दर्शन केलं. इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर आदेशला आता हॉलिवूड प्रोजेक्ट मिळाला. विशेष म्हणजे ही लावणी लाईव्ह शूट करण्यात आली असं म्हटलं जात आहे.

Adesh Vaidya
नृत्य दिग्दर्शक आदेश वैद्य (छाया सौजन्य- फेसबुक)

वाचा : आवडीची सरकारी नोकरी निवडण्याची ‘मिस वर्ल्ड’ला ऑफर

‘स्वॉर्ड्स अँड सेप्टर्स’ या चित्रपटात डेरेक जॅकोबी, नॅथानियल पारकर, रुपर्ट इवरेट या ब्रिटिश कलाकारांसोबतच नागेश भोसले, यतिन कार्येकर, मिलिंद गुणाजी, आरिफ झकारिया आणि अजिंक्य देव हे भारतीय कलाकारसुद्धा पाहायला मिळतील. विशेष म्हणजे यामध्ये अजिंक्य देव तात्या टोपेंची व्यक्तिरेखा साकारणार आहे.