‘तपस्या सिद्धी कला अकादमी’तर्फे ३१ जानेवारी रोजी कोल्हापूर येथे ‘लावणी मानवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात दोन हजारहून अधिक महिला सहभागी होणार आहेत. लावणीचा आजवरचा हा सर्वात मोठा कार्यक्रम असून याची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडून घेतली जाणार असल्याचा दावा मुंबईत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. या कार्यक्रमात १३ मिनिटांच्या लावण्या ध्वनिमुद्रित करण्यात आल्या असून त्या दोन हजारहून अधिक महिला पारंपरिक वेशात सादर करणार आहेत. संस्थेतर्फे याअगोदर ‘भरतनाटय़म’ या शास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा महाकार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात २ हजार १०० कलाकार सहभागी झाले होते. त्याची दखल ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडून घेण्यात आली होती, असेही या वेळी सांगण्यात आले.