|| मितेश जोशी

गेल्या अनेक दिवसांपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर कोल्हापुरी ठसक्यात ‘लक्ष्मे अगं ए लक्ष्मे’ अशी हाक सतत ऐकू येते आहे. ही लक्ष्मी म्हणजेच ‘ढोलकीच्या तालावर’ या शोमधून पुढे आलेली समृद्धी केळकर ही अभिनेत्री, तसंच गेले अनेक दिवस छोटय़ा पडद्यापासून लांब असलेले कलाकार ओमप्रकाश शिंदे आणि सुरभी हांडे हे त्रिकूट ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या नव्या मालिकेतून लोकांसमोर आलं आहे.

या मालिकेत नि:स्वार्थ नात्याची कथा मांडण्यात आली आहे. कोल्हापूरनजीकच्या गावात वाढलेली मालिकेतील नायिका लक्ष्मी! स्वभावाने अल्लड, सगळ्यांवर मनापासून प्रेम करणारी, बिनधास्त, स्वाभिमानी अशी ती आहे. लक्ष्मीच्या आईने लक्ष्मीचा जन्म होताच तिची साथ सोडली. ज्यामुळे नातेवाईकांच्या नजरेत लक्ष्मी पांढऱ्या पायाची झाली. अशा लक्ष्मीचं पालनपोषण तिच्या मामा-मामींनी केलं खरं! परंतु गावाला आपलीशी वाटणारी लक्ष्मी त्यांच्यासाठी मात्र परकीच राहिली. गावामध्ये सगळ्यांचं प्रेम मिळवलेली लक्ष्मी घरामध्ये सगळ्यांची उपेक्षा आणि मामीचा जाच सहन करताना मालिकेत पाहायला मिळणार आहे. या निरागस लक्ष्मीच्या आयुष्यात मल्हार नावाचा मुलगा अनपेक्षितपणे येतो. नुकताच गावात परतलेल्या मल्हारचं आर्वी नावाच्या मुलीवर खूप प्रेम आहे. आर्वी पेशाने डॉक्टर आहे. आर्वी आणि मल्हार बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून लवकरच त्यांचं लग्न होणार आहे. गावामध्ये काही कामानिमित्त आलेल्या मल्हारची भेट लक्ष्मीशी होते आणि तिथूनच खऱ्या अर्थाने ही मालिका सुरू होते आहे.

मालिकेचा अभिनेता ओमप्रकाश शिंदे त्याच्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना म्हणतो, माझी या मालिकेत मल्हार देशमुख नावाची व्यक्तिरेखा असून चेन्नईत एमबीएचं शिक्षण पूर्ण करून तो पुन्हा गावाकडे परतला आहे. त्याच्या कुटुंबाचा दुधाचा व्यवसाय आहे. मल्हारचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, संवेदनशील, भावुक आणि मनमिळाऊ आहे. तो आर्वीवर जिवापाड प्रेम करतो. कोणत्याही घडामोडीवर सदसद्विवेक बुद्धीने तो आपलं मत मांडतो. बालपण कोल्हापुरात आणि शिक्षण शहरात झाल्यामुळे गाव आणि शहर या दोन्ही राहणीमानाचा पगडा मल्हारवर आहे. व्यक्तिरेखा जरी एक असली तरी या व्यक्तिरेखेला शेड्स अनेक आहेत. ज्या मला आवडल्या. म्हणून मी ही व्यक्तिरेखा स्वीकारली, असं तो सांगतो.

‘जय मल्हार’ या पौराणिक मालिकेमधून म्हाळसाच्या भूमिकेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडे या मालिकेमधून तिच्या पौराणिक प्रतिमेला छेद देत एका नव्या रूपात दिसते आहे. ‘जय मल्हार’नंतर तिची ही दुसरीच मालिका असून मधल्या काळात तिने केवळ घरच्यांना वेळ दिला. अन्य कोणतेही प्रोजेक्ट स्वीकारले नाहीत, असं ती स्पष्ट सांगते. या मालिकेविषयी सांगताना सुरभी म्हणते, ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत कोणतीही प्रेमकथा दडलेली नाही. उलट मी म्हणेन ही एक प्रेमळ लोकांची नाजूक गोष्ट आहे. तीन वेगळ्या व्यक्तिरेखा, तीन वेगळी व्यक्तिमत्त्वं आणि त्यांचा अनोखा प्रवास अशा धाटणीची ही मालिका आहे. जसजसं हे नि:स्वार्थ नातं उलगडत जाईल तसतशी मालिका अधिक मनोरंजक होईल याची मला खात्री आहे. पुढे तिच्या मालिकेतील व्यक्तिरेखेविषयी सांगताना सुरभी म्हणते, ‘या मालिकेत माझी डॉ. आर्वी प्रधान नावाची व्यक्तिरेखा आहे. विचारांनी व कपडय़ांनी ती आधुनिक आहे. तिच्या घरच्यांचा व्यवसाय असून ती खूप श्रीमंत आहे. आर्वी स्वत:च्या धुंदीत राहणारी आणि मल्हारवर जिवापाड प्रेम करणारी आहे. मालिकेतील आर्वी म्हणजे आजच्या धावपळीच्या युगातली, स्वप्नं पाहून सत्यात उतरवणारी मुलगी आहे,’’ असं सुरभी सांगते.

‘जय मल्हार’मध्ये तुला बानू सवत होती. आता या नव्या मालिकेतही दोन नायिका आहेत. तिथेही तुझी पतीविषयीची घालमेल दिसली होती, इथेही तसाच प्रकार जाणवतो आहे. याविषयी काय सांगशील, असा प्रश्न सुरभीला विचारला असता ती म्हणाली, ‘‘ ‘जय मल्हार’ या मालिकेत मी बानूला मागच्या जन्मी वचन देऊन फसले होते. म्हणून मला म्हाळसाच्या जन्मी सवत आली. या मालिकेत मी लक्ष्मीला कोणतेही वचन दिलेले नाही आणि ही मालिका एक प्रेमकथा नसून नि:स्वार्थ नात्याची प्रेमळ कथा आहे. त्यामुळे इथे नात्याचे पैलू उलगडले जाणार आहेत,’’ असं तिने सांगितलं.

‘लक्ष्मी सदैव मंगलम’ मालिकेमध्ये आम्ही नि:स्वार्थी मनाने घरच्यांवर आणि गावावर प्रेम करणाऱ्या लक्ष्मीची गोष्ट दाखवणार आहोत. ‘कलर्स मराठी’च्या माध्यमातून आम्ही नेहमीच प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. या मालिकेमधून दाखवली जाणारी कथा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असं मला वाटतं. प्रेक्षकांना या मालिकेची कथा जवळची वाटेल तसंच मालिकेमधील वेगळेपण बघायला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ मालिकेमुळे आमचा सात वाजताचा प्राइम स्लॉट अधिक बळकट होईल, अशी आशा वाटते.     – निखिल साने, व्यवसाय प्रमुख, व्हायकॉम १८

‘लक्ष्मी सदैव मंगलम’ ही मालिका शहर आणि गाव यांच्यातील दुरावा कमी करणारी मालिका आहे. शहरातल्या धुसमुसळ्या प्रेमाला अस्सल ग्रामीण प्रेमाने रंगवणाऱ्या या मालिकेमध्ये आम्ही अतिशय निरागस आणि अवखळ अशा लक्ष्मीचा प्रवास दाखवणार आहोत. मालिकेमध्ये अनुभवी कलाकारांचा संच आणि अनोखी संकल्पना असल्यामुळे ही मालिका नक्कीच प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री वाटते.      – राकेश सारंग, निर्माते