News Flash

मूळ गोंधळ बरा होता..!

‘लक्ष्मी’ हा ज्या मूळ तमिळ चित्रपटावर बेतलेला आहे, तो ‘कंचना’ हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला होता

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

दाक्षिणात्य चित्रपट रिमेक करण्याचे बॉलीवूडचे वेड हे जुनेच आहे. दक्षिणेत ते चित्रपट यशस्वी ठरले म्हणून मग त्यात थोडाफार बदल करून, हिंदीतील प्रथितयश कलाकारांना घेऊन त्याला बॉलीवूडी अवतारात सादर करताना अनेक गोष्टी सुटून जातात. आणि मग मूळ गोंधळ बरा होता, पण हे आवरा.. असे म्हणण्याची पाळी प्रेक्षकांवर येते. राघव लॉरेन्स दिग्दर्शित ‘लक्ष्मी’ हा या अशा फसलेल्या प्रयोगातला नवा चित्रपट. खरेतर, टाळेबंदीनंतर चित्रपटगृहे पूर्ववत सुरू होण्याआधी आणि खास दिवाळीच्या सुट्टीचा मुहूर्त साधून डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झालेला ‘लक्ष्मी’ हा लोकांसाठी मनोरंजक अनुभव ठरेल, अशी अपेक्षा होती. किमान चित्रपटाच्या ट्रेलरवरून निव्वळ भयपट नाही तर ‘हॉरर कॉमेडी’ या प्रकारातील हा चित्रपट असेल, असे वाटत होते. प्रत्यक्षात ना भय ना हास्याचा थरार, त्यामुळे मनोरंजनाचा हा बार अगदीच फु सका ठरला आहे.

‘लक्ष्मी’ हा ज्या मूळ तमिळ चित्रपटावर बेतलेला आहे, तो ‘कंचना’ हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्स यांचेच होते आणि यातील मुख्य भूमिकाही त्यांनीच साकारली होती. मूळ चित्रपट हॉरर कॉमेडीच आहे, पण तो इतक्या वर्षांनंतर हिंदीत आणताना त्यावर कु ठलेही संस्कार करण्यात आलेले नाहीत. बरे तो अगदी मूळ चित्रपटाप्रमाणे घेतला आहे म्हणावे तर त्यातला विनोद नव्या रिमेकमध्ये पार हरवला आहे. त्यामुळे हा चित्रपट धड घाबरवतही नाही आणि पाहताना मजाही येत नाही. आसिफ (अक्षय कु मार) आणि रश्मी (कियारा अडवाणी) या जोडप्याची ही कथा आहे. रश्मीने वडिलांच्या इच्छेविरुद्ध मुस्लीम तरुणाशी लग्न केले असल्याने तिला माहेरचे दार बंद झाले आहे. आईच्या विनंतीवरून रश्मी आसिफसह माहेरी येते खरी.. मात्र भूतांना न घाबरणारा किंबहुना अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणारा आसिफ स्वत:च भूताटकीचा शिकार ठरतो. लक्ष्मी नामक किन्नराच्या भूताने पछाडलेला आसिफ हातात लाल रंगाच्या बांगडय़ा घालून घरात वावरू लागतो. आसिफला भूताने पछाडले आहे हे लक्षात आल्यानंतर रश्मीच्या घरच्यांचे भूत घालवण्याचे प्रकार सुरू होतात. भूताला घालवण्याच्या प्रयत्नात लक्ष्मीची खरी कथा आसिफला कळते आणि वेगळाच खेळ सुरू होतो, अशी या चित्रपटाची सर्वसाधारण कथा आहे. मूळ कथा हिंदीत आणताना त्यात थोडेफार बदल केले गेले आहेत. पण मुळात विनोदी पद्धतीने कथा मांडण्याचा हा प्रयत्न हिंदीत पुरेपूर फसला आहे.

इथे किन्नरांचे प्रश्न, त्यांचे जगणे आणि अजूनही समाजात त्यांचे न स्वीकारले जाणे या गोष्टींनाही दिग्दर्शकाने स्पर्श केला आहे. अर्थातच, चित्रपटाची कथा ही सर्वसाधारणपणे सूडकथा असल्याने किन्नरांच्या समस्या किं वा त्यांचे जगणे हा विषय इथे तोंडी लावण्यापुरताच येतो. पण आसिफला पछाडणारे भूत हे किन्नराचे असल्याने काही काळासाठी लक्ष्मीची सूडकथा बाजूला राहते. किन्नर म्हणून जगताना लक्ष्मीला करावी लागलेली धडपड, सन्मानाने जगण्यासाठी तिने केलेली शर्थ आणि त्याला हरताळ फासण्याचा झालेला प्रयत्न या गोष्टींचा प्रभाव मूळ सूडकथेवर पडतो. त्यामुळे विनोदी शैलीतील मांडणी ही सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये भूताचा गृहप्रवेश आणि त्यामुळे घरच्यांची उडालेली भंबेरी इथपर्यंतच मर्यादित राहिली आहे. उरलेला सगळा भाग हा लक्ष्मीच्या सूड घेण्याच्या प्रक्रि येसाठी खर्ची पडला आहे. इथपर्यंत प्रेक्षक पोहोचल्यावर कथेतील भूताची भीतीही संपून जाते. भूताने के वळ आपला सूड पूर्ण करण्यासाठी माणसाचा आधार घेतला आहे, हे उघड झाल्यानंतर पुढे अगदीच ठोकळेबाजपणे ही सूडकथा पूर्ण होते. कथेतही नावीन्य नाही आणि मांडणीतही नाही, त्यामुळे कितीही मोठा कलाकार आपल्यासमोर असला तरी चित्रपट मनोरंजनात कमीच पडतो.

अक्षय कु मार आणि हॉरर कॉमेडी हे यशस्वी समीकरण प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूलभुलैय्या’ चित्रपटात प्रेक्षकांनी अनुभवले आहे. २००७ साली प्रदर्शित झालेला ‘भूलभुलैय्या’ हाही मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता, मात्र हिंदीत चित्रपट आणताना कथा पूर्णपणे नव्याने मांडण्यात आली होती, त्यात योग्य ते बदलही केले होते. इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा ‘हॉरर कॉमेडी’पटात काम करण्याची संधी अक्षयला मिळाली असली, तरी ती फोल ठरली आहे. अक्षय कु मार, राजेश शर्मा, अश्विनी काळसेकर, आएशा रझा मिश्रा असा चांगल्या कलाकारांचा ताफा या चित्रपटात आहे, पण लक्ष्मीचे अस्तित्व जाणवल्यानंतर पडद्यावर फक्त अक्षय आणि शरद के ळकर हे दोनच चेहरे दिसतात. कियारा अडवाणीला तर या चित्रपटात एका गाण्यात नाचण्याशिवाय बाकी काही काम नाही. बाकीच्या व्यक्तिरेखा कु ठेही दिसत नाहीत. चित्रपटाचा शेवटही झटपट गुंडाळला आहे. ‘लक्ष्मी’पेक्षा मूळ ‘कं चना’ हा चित्रपट पाहणे अधिक रंजक आहे. त्यामुळे तो पहिलाच गोंधळ बरा होता..

लक्ष्मी

दिग्दर्शक – राघव लॉरेन्स

कलाकार – अक्षय कुमार, कियारा अडवाणी, शरद केळकर, राजेश शर्मा, अश्विनी काळसेकर, आएशा रझा मिश्रा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 12:00 am

Web Title: laxmii movie review abn 97
Next Stories
1 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये स्वप्नील जोशीचा सहभाग; दिवाळीनिमित्त नवीन प्रयोग
2 आईच्या जुन्या साडीतून रितेश देशमुखने बनवले मुलांसाठी नवीन कपडे; पाहा व्हिडीओ
3 इराने आई-वडिलांसोबतच किरण रावला देखील सांगितले होते नैराश्याविषयी, मिळाला होता हा सल्ला
Just Now!
X