रंगभूमी, सिनेसृष्टी अशा दोन्ही ठिकाणी तसंच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सुपरस्टार म्हणजे ‘लक्ष्मीकांत बेर्डे’. प्रेक्षकांचा लाडका ‘लक्ष्या’ आपल्यातून निघून गेल्याला चौदा वर्षं झाली. त्याने साकारलेल्या भूमिका आजही स्मरणात आहेत. लक्ष्याचा जीवनप्रवास, त्याचं आयुष्य हा नवीन कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. सध्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरू असतानाच लक्ष्याचाही जीवनप्रवास प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तोही नाटकाच्या माध्यमातून.

‘लक्ष्या’च्या आयुष्यावर आधारित नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रंगभूमीवर एका कलाकाराचा जीवनप्रवास मांडला जाणार आहे. ‘लक्षातला लक्ष्या’ या नाटकाद्वारे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे चाहत्यांना पुन्हा एकदा रंगमंचावर अनुभवायला मिळणार आहे. पुरूषोत्तम बेर्डे या नाटकाची निर्मिती आणि लेखनाची धुरा सांभाळत आहेत. तर विजय केंकरे या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत.

वाचा : सतिश राजवाडे १९ वर्षांनंतर रंगमंचावर 

या नाटकामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेचा लहानपणापासून ते अखेरपर्यंतचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. नाटकामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं साकारली जाणार आहे. नाट्यशास्त्राच्या ‘मेक बिलिव्ह थिअरी’वर हे चरित्र्यनाट्य अभिकथनातून उभं राहणार आहे. पुरुषोत्तम बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दोन भावंडांमध्ये फोनवर संभाषण होणार आहे आणि त्यातूनच ‘लक्ष्या’चा जीवनप्रवास आपल्यासमोर मांडला जाणार आहे. या नाटकाची तालीम सध्या जोरात सुरू असून येत्या १६ डिसेंबरला म्हणजेच ‘लक्ष्या’च्या पुण्यतिथीला हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.