बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार लवकरच ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी केले आहे. हा चित्रपट एका ट्रान्सजेंडर भूतावर आधारित आहे. आता अक्षय आणि राघवने खऱ्याखुऱ्या आयुष्यात ट्रान्सजेंडर्सला मदत करण्याचे ठरवले आहे.

चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना अक्षय आणि राघवमध्ये ट्रान्सजेंडरशी संबंधीत चर्चा सुरु होती. त्यानंतर त्या दोघांनी चेन्नईमध्ये ट्रान्सजेंडर्ससाठी घरे उभारणार निर्णय घेतला. खुद्द राघवने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. ‘मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो. भारतात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर्ससाठी घरे बांधण्याकरीता अक्षय कुमार सरांनी १.५ कोटी रुपये दान केले आहेत’ असे राघवने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

राघव गेल्या १५ वर्षांपासून ‘लॉरेन्स चॅरिटेबल ट्रस्ट’ चालवत आहे. या ट्रस्टद्वारे तो अनेक मुलांना शिक्षण, लहान मुलांसाठी घरे बांधणे तसेच दिव्यांगाना मदत करत असतो. यंदा त्याच्या ट्रस्टला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने राघवला ट्रान्सजेंडर्ससाठी काही तरी करायचे होते. त्याने या संबंधी अक्षय कुमारशी बोलून त्यांच्यासाठी घरे उभारण्याचा निर्णय घेतला.

पाहा : अक्षय कुमारचं ८० कोटींचं घर; जुहूमधील हा अलिशान बंगला आतून एकदा पाहाच

‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट ‘कंचना २’चा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. या चित्रपटात अक्षयसह अभिनेते अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघव लॉरेन्स या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून ५ जून २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खिलाडी कुमार हा एक असा अभिनेता आहे ज्याने आतापर्यंत अॅक्शन, विनोदी, गंभीर, प्रेमकथा अशा प्रत्येक धाटणीच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. त्याचे हे वेगवेगळे प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरले. आता ‘लक्ष्मी बॉम्ब’मधील अक्षयची वेगळी भूमिका पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.