उरी हल्ल्याला आता काही दिवस उलटले असले तरीही या हल्ल्याचे पडसाद सर्वच क्षेत्रांध्ये पाहायला मिळत आहेत. त्यातही काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. मनसेच्या या मागणीमुळे भारतात आलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या बॉलिवूड कारकीर्दीवर एक प्रकारचे सावट आले आहे. कलाविश्वातून मनसेच्या या मागणीला काही कलाकारांनी, निर्माते- दिग्दर्शकांनी उघडपणे विरोध दर्शवला आहे. हंसल मेहता, मुकेश भट्ट विक्रम भट्ट यांमागोमाग करण जोहरनेही याबाबत त्याचे मत मांडले आहे.

मनसेने पाकिस्तानी कलाकारांना दिलेल्या इशाऱ्यामुळे फवाद खान आणि माहिरा खान यांच्या आगामी चित्रपटांवरही याचा परिणाम होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान एका वृत्तवाहिनीसमोर आपले मत मांडताना करण जोहर म्हणाला की, ‘या हल्ल्याबाबत व्यक्त होणारा राग आणि असंतोष मी समजू शकतो. या हल्ल्यात शहिद झालेल्यांसाठी मला फार दु:ख वाटत आहे. या दहशतवादी कृत्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही. पण पाकिस्तानी कलाकारांवर बंदी टाकून यावर तोडगा निघणार का?’ असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.

‘कलाकारांना देशाबाहेर जाण्याचा इशारा देणे ही चुकीची बाब आहे. निदान मला तरी असेच वाटते. या परिस्थितीमध्ये एखाद्या कलाकार आणि कलेवर बंदी आणण्यापेक्षा अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे’ असेही करण म्हणाला. ‘मला या विषयी बोलताना प्रचंड राग येत आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे जर माझ्या चित्रपटांवर काही परिणाम होणार असतील तर ही बाब नक्कीच मला निराश करणारी ठरेल, असे विधानही त्याने केले. ‘अशा वेळी अनेकदा तुम्हाला हात जोडून इतकेच सांगावेसे वाटते की, आम्ही कला विश्वाशी संबंध असणारी माणसं आहोत. आम्हाला कृपा करुन एकटे सोडा. आम्ही चित्रपट बनवतो. आमच्या कामातून आणि चित्रपटांच्या माध्यमातून अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद येतो. त्यामुळे आमच्यावर निशाणा साधणे कृपया बंद करावे’, असे मत करण जोहरने मांडले आहे. २८ ऑक्टोबरला करणचा आगामी चित्रपट ‘ए दिल है मुश्किल’ रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा यांच्यासह पाकिस्तानी अभिनेता फवाद खानही झळकेल. राजकारण आणि कलाकारांच्या पाकिस्तान परतीचा वाद असला तरीही रसिकांमध्ये मात्र या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.