अभिनेता अक्षय कुमार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या खिलाडी कुमार त्याच्या आगामी ‘टॉयलेट-एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. पण सध्या हा चित्रपट कायद्याच्या कचाट्याच सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मथुरेमध्ये सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. पण स्थानिक नियमांचे पालन न केल्यामुळे हा चित्रपट सध्या अडचणीत आला आहे. मथुरा येथील ब्रज भागातील काही चालीरितींविरुद्ध कथानकाचे चित्रण करण्यात आल्यामुळे एका वकिलाने चित्रपटाच्या दिग्दर्शकांविरोधात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

‘भगवान कृष्ण हे नंदगावचे रहिवासी होते आणि राधा त्यांची प्रेयसी होती. राधा बनारसची रहिवासी होती, असे म्हटले जाते. या दोन्ही भागातील मुलं-मुली एकमेकांशी लग्न करु शकत नाहीत. पूर्वापार चालत आलेली ही प्रथा आजही कायम आहे’, असे वकिल गोकलेश कटारा यांनी स्पष्ट केले आहे. सध्या या चित्रपटाच्या निर्मात्यांची टीम नंदगावमध्ये दाखल झाली आहे. प्रसारमाध्यमांपासून ही टीम सध्या काहीशी दूर राहण्याचाच प्रयत्न करत आहे. पण, चित्रपटाची तयारी सुरु असतानाच तेथील काही स्थानिकांना या चित्रपटाच्या कथानकाबद्दल कुणकुण लागली. या चित्रपटातील एक दृश्य ज्यात ‘नंदगाव का छोरा, बनारस की छोरी’ असा उल्लेख आहे, त्याचे नुकतेच चित्रीकरण करण्यात आले.

याचिकाकर्ते वकिल कटारा यांनी त्यांना या चित्रपटाच्या कथेविषयी जास्त काही माहिनी नसल्याचेही स्पष्ट केल्याचे वृत्त एका इंग्रजी संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे. ‘जर या चित्रपटामध्ये नंदगाव आणि बरसानाच्या मला-मुलीचं लग्न दाखविण्यात आलं, तर चित्रपटाच्या दिग्दर्शकांविरोधात येथील स्थानिकांच्या भावना दुखावल्याप्रकरणीची याचिका दाखल करण्यात येईल’, असे सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांच्या निमित्ताने आणि सोशल मीडियावर त्याने केलेल्या पोस्ट्समुळे चर्चेत आहे. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार लागोपाठ हिट चित्रपट देत आहे. त्याने केलेल्या आताच्या चित्रपटांवर नजर टाकली तर आपल्याला सद्य परिस्थितीवर आणि देशभक्तीपर चित्रपटात त्याने काम केलेले पाहायला मिळेल. पण, आता तो काही वेगळ्याच विषयासह आणि शीर्षकासह सर्व चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकरसह स्क्रिन शेअर करत खिलाडी कुमार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.