News Flash

मातीच्याच चुली!

मराठीत दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणून ‘जय मल्हार’ या पौराणिक मालिकेचा उल्लेख करावाच लागतो.

|| रेश्मा राईकवार

एकेकाळी पौराणिक – ऐतिहासिक मालिका या क्वचितच पाहायला मिळायच्या. मराठी टेलीविश्वात तर सध्या पौराणिक आणि ऐतिहासिक मालिकांची एकच लाट आली आहे. मात्र या मालिकांमधून केवळ ऐतिहासिक घटना आणि पुराणकथा न मांडता त्याआधारे तत्कालीन व्यक्ती, त्यांचे स्वभाव, त्यांची एकमेकांशी असलेली नाती, हेवेदावे, देवांच्या भूमिकेत असले तरी देव आणि देवी यांच्यातील तिखटगोड भांडणं अगदी घरोघरी मातीच्या चुली या अर्थाने रंगणाऱ्या चुलीपुढच्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नेहमीच्या मालिकेतील सासू-सुनांचा संघर्ष पाहण्यापेक्षा या मालिकोंमधील गोष्टी प्रेक्षकांना आवडू लागल्या आहेत. देव असोत वा संभाजी राजे, सोयरा मातोश्री असोत वा नव्याने दाखल झालेली छोटी रमा आणि कठोर वाटणाऱ्या गोपिकाबाई या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटू लागल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘स्वामी’ या मालिकेतून माधवराव पेशवे आणि रमाबाईंची प्रेमकथा प्रेक्षकांनी पाहिली होती. ही मालिका ज्या पिढय़ांनी पाहिली त्यांच्यावर त्या मालिकेचा प्रभाव अजूनही आहे. आता रमा-माधवाची हीच कथा ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘स्वामिनी’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. मात्र इथे ही रमा-माधवांच्या कथेभोवती न फिरता, पेशव्यांच्या घरातील स्त्रिया, गोपिकाबाईंची सत्तेची सूत्रं सांभाळण्याची धडपड, छोटय़ा रमेचा मानीपणा अशा अनेक कंगोऱ्यांभोवती फिरताना दिसते. एरव्ही घरातील गोष्टी वाटतील अशा पेशव्यांच्या घरातील गोष्टी या मालिकेत केंद्रस्थानी असणार आहेत. पेशवे म्हटले की त्यांच्या कर्तृत्वाची गाथा न मांडता या आजूबाजूच्या गोष्टींवर प्रकाश टाकावासा का वाटला, याबद्दल बोलताना मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान म्हणतात, रमा-माधवाची कथा याआधी ‘स्वामी’मालिकेतून मीही पाहिलेली आहे. तेरा भागांची ही मर्यादित मालिका होती, मात्र पेशवाईचा आवाकाच मोठा आहे. ‘पेशवे घराण्याचा इतिहास’ हा दोन खंडांचा ग्रंथ जर वाचला तर त्यात त्यावेळच्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल एकेक-दोन ओळीतील वर्णनं आहेत. जी खूप सुंदर आहेत. ती मांडली गेली पाहिजेत, लोकांना ती आवडतील, असा विचार माझ्या मनात आला. म्हणजे राघोबादादा आहेत, नानासाहेब पेशवे, विश्वासराव असोत किंवा आनंदीबाई आहेत, ज्या अजून मालिकेत आलेल्या नाहीत. अनूबाई घोरपडे म्हणजे बाजीराव पेशव्यांची सख्खी बहीण या सगळ्या व्यक्तिरेखा खूप छान लिहिल्या गेल्या आहेत. इतिहासातील व्यक्ती ही आपल्यासारखीच माणसं होती. त्यांच्याकडेही संस्कार होते, वाद होते, रागरुसवे होते. त्यावेळीही एक संस्कृती होती. त्यावेळचे पदार्थ, वस्तू, सणवार हे आताच्या पिढीला माहितीच नाही. माझी एक पिढी अशी आहे ज्यांनी जुन्या गोष्टींविषयी आपल्या आजी-आजोबांकडून ऐकलेलं आहे. आणि आधुनिक काळातील बदलही अनुभवतो आहोत. त्यामुळे जे जुनं आपल्याला ऐकून, काहीसं पाहिलेलं माहिती आहे ते मांडून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं वाटतं. हे सगळं लक्षात घेऊन ‘स्वामिनी’ या मालिके तील व्यक्तिरेखा त्यांच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता, संदर्भानुसार नव्याने लिहिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. अर्थात, अशा पद्धतीने ऐतिहासिक गोष्टी बदलत्या संदर्भानुसार मांडताना टीव्ही माध्यमाचाही विचार करावाच लागतो, असं ते म्हणतात. नाटक किंवा चित्रपटात अशा गोष्टी आपण ठामपणे आपलं मत म्हणून मांडू शकतो. टीव्ही हे प्रेक्षकाभिमुख माध्यम असल्याने तिथे ते स्वातंत्र्य घेताना खूप जबाबदारीने लेखन करावं लागतं. पण तेही अवघड नाही, कारण तसे संदर्भ आज आपल्याक डे उपलब्ध असल्याने त्याच्या आधारे आपण अशा कथा मांडू शकतो, असंही वीरेंद्र यांनी स्पष्ट केलं.

मराठीत दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणून ‘जय मल्हार’ या पौराणिक मालिकेचा उल्लेख करावाच लागतो. खंडेराय हे महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहे, मात्र शंकराच्या या मनुष्य अवताराची कथा सांगताना म्हाळसा आणि बानू या त्याच्या दोन पत्नी, या दोघींमधील हेवेदावे, सवतीबद्दलचा राग या सगळ्याचा मिलाफ मालिकेतील कथानकात होता. अनेकदा तर इतर प्रेमकथांप्रमाणेच दोघांमध्ये तिसरा.. या शैलीची मालिका आहे, अशीही टीका झाली. पण ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. देव असला तरी तो मनुष्य अवतारात असल्याने त्याला सगळ्या मानवी भावना लागू पडतात, हे लोकांना लक्षात आणून देणं गरजेचं होतं. जे आम्ही ‘जय मल्हार’मालिकेच्या पहिल्या काही भागांतच स्पष्ट के लं होतं, असं निर्माते महेश कोठारे सांगतात. जयाद्रीने आपल्या मनातील भावना प्रामाणिकपणे बोलून दाखवल्यामुळे प्रसन्न होऊन पार्वती तिला महादेवांच्या पुढील अवतारात तू त्यांची अर्धागिनी होशील, असा वर देते. तेव्हा मनुष्य अवतारात तू हे विसरणार आहेस, त्यावेळी तुझ्या भावना वेगळ्या असतील, हा वर देणे चुकीचे आहे याची जाणीव महादेव पार्वतीला करून देतात. त्यामुळे पुढचं कथानकही त्या पद्धतीनेच मांडलं गेलं. आता ‘विठू माउली’ ही मालिका करतानाही लोक विठ्ठलाशी माउली म्हणून संवाद साधतात, तो त्यांना आपला वाटतो. त्यामुळे रुक्मिणी आणि त्याच्यातील जे नातं आहे ते आपल्या घरातील सदस्याचं असावं याच पद्धतीने, त्याच तन्मयतेने लोक पाहतात. अर्थात, यात लेखक-दिग्दर्शक यांचा वाटा मोलाचा ठरतो, असं महेश कोठारे म्हणतात. ‘विठू माउली’ या मालिकेचे लेखक पराग कुलकर्णी यांच्या मते देव हे देव म्हणून न येता ते सामान्यपणे लोकांसमोर येणं गरजेचं आहे. कारण मुळातच ते तसे असतात. त्यांच्यातील दैवी शक्ती या तपोबलाने त्यांनी मिळवलेल्या आहेत, मात्र या शक्ती बाजूला ठेवून आपण जेव्हा त्यांचा विचार करतो किंवा पोथी-पुराणांमधून त्यांच्या कथा वाचतो. तेव्हा ही दैवतं सामान्य माणसासारखीच वागत होती हे सहज लक्षात येतं. त्यामुळे मालिकेतून त्यांची कथा मांडताना केवळ कथेच्या तपशिलावर भर न देता देवांच्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करून कथा लिहिली जाते, असं ते म्हणतात. म्हणजे, विठ्ठलाच्या कथा वाचताना त्या काळीही स्त्रियांचा सन्मान केला जात होता, त्यांच्याबद्दल कमालीचा आदर होता, हे आपल्या लक्षात येतं. मग हे जे वास्तव आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे आणि ते त्यांच्या आवडत्या दैवताच्या तोंडून आलं तर ते लोकांना जास्त पटतं. त्यामुळे पौराणिक कथा लिहितानाही देवांमधील हे मानवी स्वभावाचे पैलू त्याच सहजतेने लिहिले जातात आणि लोकांपर्यंतही ते विचार त्याच तळमळीने पोहोचतात, असं त्यांनी स्पष्ट केलं.

लेखक-अभिनेता चिन्मय मांडलेकर याच्या मते मात्र आताच्या काळात कुठलीही मालिका किंवा कलाकृती ही मानवी दृष्टिकोनातूनच अभ्यासली जाते, मांडली जाते. त्याची मुख्य भूमिका असलेली ‘तू माझा सांगाती’ ही मालिकाही दीर्घकाळ चालली आणि लोकांना खूप आवडली. तुकारामांची कथा ही पन्नासच्या दशकांत ‘संत तुकाराम’ चित्रपट आला होता, त्या पद्धतीने मांडली गेली असती तर ती प्रेक्षकांना अधिक भाबडी वाटली असती. आत्ताच्या काळात बनवताना ती आजच्या संदर्भानुसार येणंच गरजेचं होतं. दुसरं म्हणजे या मालिका घरात बसून एकत्र बघितल्या जातात. मालिकेत जे दाखवलं आहे ते मग विठ्ठलाच्या बाबतीत असलं तरी अरे हे माझ्याही घरात घडतं, असं जेव्हा प्रेक्षकाला वाटतं तेव्हाच तो मालिकेशी जोडला जातो आणि मालिका सर्वदूर पोहोचते. त्यामुळे मालिकाकर्तेही खूप हुशारीने या मालिकांचे लेखन, सादरीकरण करतात, असं चिन्मय म्हणतो. सध्या सुरू असलेली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका असेल किंवा ‘उंच माझा झोका’सारखी मालिका होती जी लोकांना आवडली. या मालिके तील त्या ऐतिहासिक पात्राची गोष्ट, त्याचा स्वभाव, त्याचे इतर लोकांबरोबरचे वागणे-बोलणे या सगळ्या गोष्टी पाहण्यात लोकांना जास्त रस असतो आणि दुसरं म्हणजे कठिणातील कठीण गोष्ट जर प्रेक्षकांना अशा पद्धतीने सोपी करून सांगितली तर ती त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचते. त्यामुळे मालिकांमधील ऐतिहासिक पात्रं असोत वा पौराणिक पात्रं असोत त्यांचे मानवी पैलू लोकांना जास्त भावतात हे लक्षात घेतले पाहिजे, असे त्याने सांगितले.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जय मल्हार’ मालिकेनंतर आता ‘कलर्स मराठी’वर ‘लक्ष्मी नारायण’ मालिकेची निर्मिती करणारे संतोष अयाचित हे पुराणातील गोष्टी या प्रतीकात्मकच होत्या, याकडे लक्ष वेधतात. पुराणातील जी प्रतीकं होती त्यांना काहीएक स्वरूप त्यावेळी ऋषीमुनींनी दिलं होतं. त्यांच्यातील जी वैयक्तिक नाती आहेत, त्याची वर्णनंही ऋषीमुनींनी त्या काळानुसार लिहिलेली आहेत. त्यांनी मांडलेल्या या गोष्टी मुळातच उत्तम कथाकथन कसं असावं याचा आदर्श आहेत. त्यात मुळातच एक शैली आहे, रंजकता आहे. त्यामुळे ते समजून घेऊन व्हीएफएक्ससारखे तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरून, कलाकारांच्या अभिनयातून ते मांडण्याचं काम केलं जातं आहे, असं ते म्हणतात. ‘गेम ऑफ थ्रोन्स’सारख्या गाजलेल्या मालिकेचा लेखक त्याने भारतीय प्राचीन कथांमधून या मालिकेसाठी प्रेरणा घेतल्याचे सांगतो. याचाच अर्थ आपल्याकडे जे पौराणिक साहित्य आहे ते समृद्ध आहे. या कथा जर वाचल्या तर त्यात शस्त्रास्त्रे, कपडे यांची सुंदर वर्णनं केलेली आढळतात. आपण त्या गोष्टींना केवळ देवाच्या गोष्टीइतकं  मर्यादित अर्थाने पाहतो. मी व्यक्तिश: त्याच्याकडे गोष्ट म्हणून पाहतो आणि तसं जर पाहिलं तर त्यातील अनेक तपशील आपल्याला लक्षात येतात. ‘जय मल्हार’ या मालिकेत खंडोबांनी म्हाळसेला जो दर्पण दिला होता तो या मालिकेनंतर तत्कालीन टॅब म्हणून लोकप्रिय झाला. मात्र मुळात त्या दर्पणाचं वर्णन खंडोबाच्या चरित्रात आहे. एकाच घटनेची प्रत्येक पौराणिक ग्रंथात केलेली वर्णनंही वेगवेगळी आहेत. याचा अर्थ त्यावेळी लिहिणाऱ्यांनी आपला त्या घटनेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यानुसार या कथा लिहिल्या हेही लक्षात येतं. म्हणजे समुद्र मंथनाची कथा मरकडेय पुराणात वेगळ्या पद्धतीने आहे. इतर पुराणात वेगळी आहे, आम्ही ‘लक्ष्मी नारायण’ मालिकेत जो संदर्भ घेतला आहे तो लक्ष्मीच्या दृष्टिकोनातून पुराणात केलेलं समुद्र मंथनाचं वर्णन आहे. त्यामुळे या घटना, व्यक्तिरेखा आणि त्यांचे आलेले संदर्भ जोडून घेण्याचं काम आपल्याला करावं लागतं. ही जी वर्णने आहेत, व्यक्तिरेखा आहेत त्यांचा अभ्यास करून त्यांच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता ती लोकांसमोर मांडण्याची तारेवरची कसरत आम्ही करतो, असं त्यांनी सांगितलं. अर्थात, नव्या संदर्भानुसार लिहिलेल्या या मालिका प्रेक्षकांकडून तितक्याच चटकन स्वीकारल्या जात नाहीत, यावरही त्यांनी बोट ठेवले. ‘जय मल्हार’ या मालिकेचं पहिल्या आठवडय़ाचं रेटिंग हे सर्वात कमी होतं, कारण लोकांसाठी अशा पद्धतीने महादेवाची कथा येणं हा धक्का होता. पण जशी मालिकेतील कथा त्यांना पटत गेली, तसा त्यांचा प्रतिसाद वाढला आणि नंतरचा इतिहास सर्वानाच माहिती आहे. त्यामुळे लोकांना जर या कथा आपल्याशा वाटल्या तरच त्या पाहिल्या जातात, हे वास्तव लक्षात घेऊनच पौराणिक असो वा ऐतिहासिक मालिका असोत त्यांची रचना लोकांना आवडेल अशा पद्धतीनेच करावी लागते, असं मालिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.

एकूणच देवी-देवता असोत वा ऐतिहासिक व्यक्तिरेखा असोत, त्यांच्या गोष्टीतील मानवी मूल्यं प्रेक्षकांना जास्त आकर्षित करतात आणि म्हणूनच सुरुवातीच्या काळात ज्या साचेबद्ध पद्धतीने या मालिका लिहिल्या जात होत्या, मांडल्या जात होत्या तशा पद्धतीने त्या आता मांडल्या जात नाहीत. उलट विठ्ठल आणि रुक्मिणीचा संसार, रुक्मिणीचं रागावणं, महादेव-पार्वतीची भांडणं आणि त्यानंतर पार्वतीचं तडकाफडकी निघून जाणं, पेशवाईचा थाट अवतीभोवती असतानाही येणाऱ्या सुनेला मुठीत ठेवण्यासाठी असलेली गोपिकाबाईंची सासू म्हणून केली जाणारी धडपड या गोष्टी लोकांना जास्त भावतात. आणि म्हणूनच या मालिकांनी कात टाकली असून नव्या संदर्भानिशी गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडण्याचं भान मालिकाकर्ते जाणीवपूर्वक जपताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 2:02 am

Web Title: legendary historical marathi serial abn 97
Next Stories
1 विद्या बालन नव्या अवतारात..
2 वेदनेचा विनोद साकारणारा दिग्दर्शक
3 ‘डॉ. आनंदीबाई ’: सेल्फीमग्न पिढीची चिकित्सा
Just Now!
X