ज्येष्ठ लेखक आणि चित्रपट निर्माते सागर सरहदी यांचे निधन झाले आहे. ते 87 वर्षांचे होते. सागर सरहदी यांनी त्यांच्या मुंबईच्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. सरहदी यांनी नूरी, बाजार, कभी कभी, सिलसिला, चांदनी, दीवाना आणि कहो प्यार प्यार है, असे चित्रपट लिहिले आहेत.

प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना कार्डियाक केअर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयासंबंधित त्रास होत होता. 2018मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गंगासागर तलवार ते सागर सरहदी

सरहदी यांचे मूळ नाव गंगासागर तलवार असे होते. बॉलिवूड दिग्दर्शक रमेश तलवार हा त्यांचा पुतण्या. भारत पाकिस्तानच्या सीमेवर त्यांचे गाव होते. फाळणीनंतर आलेल्या रेफ्युजींमध्ये त्यांना सरहदी म्हणून संबोधले जात होते. फाळणीच्या वेळी सरहदी 16 वर्षांचे होते. त्यावेळचा भीषण रक्तपात सरहदी यांनी पाहिला होता. जात, धर्म, नाव यातला फोलपणाविषयी ते सतत बोलायचे. त्यांनी लिहिलेल्या पटकथांमधून सामाजिक जाणीव दिसायची. ”मी सरहदवरून आलेला माणूस. राहतोय सागरकिनारी. मला भूभागावरूनच ओळखायचे असेल तर माझी खरी ओळख ही ‘सागर सरहदी’ ही आहे”, असे सरहदी सांगायचे. अशाप्रकारे गंगासागर तलवार हे नाव सागर सरहदी झाले.

उत्कृष्ट कथाकारांमध्ये गणना

हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कथाकारांमध्ये सागर सरहदींची गणना केली जाते. कभी कभी, सिलसिला आणि दिवाना या चित्रपटासह त्यांनी अनेक हिट चित्रपटांची कथा लिहिली आहे. बाजार या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. या चित्रपटात स्मिता पाटील, फारुख शेख आणि नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

चित्रपट निर्माते अशोक पंडित म्हणाले….

 

सरहदी यांच्या निधनानंतर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ”प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले हे ऐकून दुःख झाले. त्यांनी कभी कभी, नूरी, चांदनी, दूसरा आदमी आणि सिलसिला असे अनेक चमकदार चित्रपट लिहिले. त्यांनी बाजार या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले. फिल्म इंडस्ट्रीचे हे मोठे नुकसान आहे.”