अमली पदार्थविरोधी पथकाकडून (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीचा तिसरा दिवस आहे. रिया एनसीबी कार्यालयात दाखल होतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रियाने जो टी-शर्ट परिधान केला आहे, त्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. रियाने काळा टी-शर्ट परिधान केला असून त्यावर लिहिलेला मजकूर विशेष लक्ष वेधून घेत आहे.

‘पुरुषप्रधान व्यवस्थेला संपवू’, अशा आशयाचा मजकूर तिच्या टी-शर्टवर पाहायला मिळत आहे. दिवंगत अभिनेता सुशांतचा नोकर दीपेश सावंतने दिलेल्या माहितीच्या आधारे रविवारपासून एनसीबीने रियाकडे चौकशी सुरू केली. आज तिच्या चौकशीचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून रिया जेव्हा चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात येत होती, तेव्हा माध्यमांच्या पत्रकारांनी तिच्याभोवती घोळका केला. त्याचेही बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यावरून माध्यमांवर टीका करण्यात आली. आता एनसीबी कार्यालयाजवळ बॅरिकेड्स लावण्यात आले असून माध्यमांच्या प्रतिनिधींना रियापासून बऱ्याच अंतरावर ठेवण्यात आलं आहे.

https://www.instagram.com/p/CE3XkgAHnzh/

सोमवारी एनसीबीकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर रिया वांद्रे पोलीस ठाण्याकडे रवाना झाली. तिथे रियाने सुशांतच्या दोन बहिणी प्रियांका सिंह व मितू सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. सुशांतला औषधांची बोगस प्रिस्क्रीप्शन पाठवल्याची तक्रार रियाने केली. तिच्या तक्रारीवरून सुशांतच्या दोन बहिणी व दिल्लीतील डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात वांद्रे पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.