हरवलेल्या पतीचा शोध घेणाऱ्या एका आदिवासी महिलेचे ‘प्रवासनाटय़’ उलगडणाऱ्या ‘लायर्स डाइस’ हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करच्या सवरेत्कृष्ट परदेशी चित्रपट गटासाठी निवडण्यात आला आहे. गीतू मोहनदास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नवाझुद्दिन सिद्दिकी आणि गीतांजली थापा यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. २०१५ मध्ये होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात भारताच्या वतीने प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ लायर्स डाइस’ या चित्रपटाच्या शर्यतीत २९ चित्रपट होते, अशी माहिती भारतीय चित्रपट महासंघाचे (एफएफआय) सरचिटणीस सुप्राण सेन यांनी मंगळवारी ‘पीटीआय’शी बोलताना दिली.
संघटनेच्या वतीने दरवर्षी ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा चित्रपट निवडला जातो. यंदा यासाठी ३० चित्रपटांची नोंद संस्थेकडे करण्यात आली होती. भारत आणि तिबेटच्या सीमेवर राहणाऱ्या एका तरुण आदिवासी महिलेची कथा या चित्रपटात आहे. दिल्लीत नोकरी करणारा तिचा पती रजा घेऊन घरी परतण्यासाठी निघतो. पण बऱ्याच काळानंतरही तो घरी परतत नाही. मग त्याची पत्नी आपल्या पतीचा शोध घेण्यासाठी आपल्या मुलीसोबत दिल्लीला यायला निघते. याच वेळी तिची गाठ जवानाशी पडते. या जवानाला (सिद्दिकी) त्या दोघींना भविष्यात काय काय हाल सोसावे लागतील, याची जाणीव होते आणि तो शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहण्याचे ठरवतो.
‘लायर्स डाइस’ हा मोहनदास यांच्या पहिलाच चित्रपट आहे. अनेक महोत्सवांमधून या चित्रपटाला समीक्षकांनी वाखाणले आहे. रॉटरडॅम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि ‘सनडान्स’ चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली होती. या चित्रपटातील सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार गीतांजली हिला मिळाला आहे. तर गीतू मोहनदास यांना सवरेत्कृष्ट छायांकनाचा पुरस्कार मिळाला आहे.
सवरेत्कृष्ट परदेशी चित्रपट गटात भारतीय चित्रपटाला अद्याप ऑस्कर मिळालेला नाही. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘लगान’ चित्रपटाने २००१ मध्ये पहिल्या पाच चित्रपटांत स्थान मिळवले होते. याआधी ‘मदर इंडिया’ आणि ‘सलाम बॉम्बे’ या दोन चित्रपटांनी पहिल्या पाच चित्रपटांमध्ये स्थान मिळवले होते. ८७ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पुढच्या वर्षी २२ फेब्रुवारीला होणार आहे.

आम्हा सर्वासाठी उत्साह द्विगुणित करणारी ही बातमी आहे. प्रचंड मेहनत आणि थोडेसे नशीब यांच्या जोरावर या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. -गीतू मोहनदास, दिग्दर्शक

अभिनेत्री असलेल्या गीतू मोहनदास हिने जेव्हा चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले, तेव्हा तिच्याकडे पैशांची चणचण होती. चित्रपटासाठी पै पै जमवले. यात तिच्या पतीची तिला महत्त्वाची साथ लाभली.

हे स्पर्धेत होते..
शाहीद, क्वीन व मर्दानी (हिंदी)
यलो व फॅण्ड्री (मराठी)
जतीश्वर व अपुर पांचाली (बंगाली)