theshaukeens1बॉलिवूडमधील सुरवातीच्या काळात हिंदी शिकण्यासाठी आपण ‘खिलाडी’ कुमारचे चित्रपट पाहात होतो, अशी कबुली लिसा हेडनने दिली. ‘दी शौकिन्स’ या आगामी चित्रपटात मॉडेल-अभिनेत्री लिसा हेडन अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. अक्षय कुमारसोबत मोठा पडदा शेअर करणे आपल्यासाठी अविश्वसनीय असल्याचे सांगत लिसा म्हणाली, मी अक्षय कुमारची चाहती आहे, पण ‘दी शौकिन्स’ चित्रपटात साकारत असलेल्या क्रेझी फॅनसारखी नाही. जर प्रत्यक्ष जीवनात मी अक्षयची अशाप्रकारची चाहाती असती, तर त्याने कधीच माझ्याबरोबर काम केले नसते. माझ्या मनात त्याच्याविषयी कमालीचा आदर आहे. अक्षय कुमारचे हिंदी अतिशय चांगले असल्याने हिंदी शिकताना मी त्याचे चित्रपट पाहून हिंदीचा सराव करत असल्याचे ती म्हणाली. ‘दी शौकिन्स’ चित्रपट दिग्दर्शक बासू चॅटर्जींच्या १९८२ सालच्या ‘शौकीन’ चित्रपटाचा रिमेक आहे. नव्या चित्रपटात अनुपम खेर, पियुष मिश्रा आणि अन्नु कपूर यांच्यासुध्दा भूमिका आहेत. चित्रपटात हे सर्वजण त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान असलेल्या मुलीच्या प्रेमात पडलेल्या व्यक्तिची भूमिका साकारत असून, त्या मुलीच्या भूमिकेत लिसा दिसणार आहे. अक्षय कुमार निर्माता असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘तेरे बिन लादेन’ चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक शर्मा याने केले आहे. ‘दि शौकिन्स’ ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.