जवळपास २७ वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने आणि अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता सलमान खान सध्या ‘रेस ३’ या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये व्यग्र आहे. सलमान जितका त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो, तितकाच तो इतरांची मदत करण्यासाठीही ओळखला जातो. अशा या भाईजानच्या वरहस्तामुळे कलाविश्वात आज बरेच चेहरे सेलिब्रिटी म्हणून वावरत आहेत.

करिअरच्या सुरुवातीलाच सलमानची साथ मिळाल्यामुळे बॉलिवूडमध्ये नावारुपास आलेल्या या सेलिब्रिटींची यादी काही लहान नाही. असं असलं तरीही या यादीतील अशी काही नावं आहेत, जी सलमानचा उल्लेख होताच लगेचच आपल्या नजरेत येतात. चला तर मग नजर टाकूया, अशाच काही नावांवर…

कतरिना कैफ-
कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी एकेकाळी कलाविश्वात बराच जोर धरला होता. बूम या चित्रपटातून कतरिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं खरं. पण, त्या चित्रपटातून तिच्या नावाला हवीतशी प्रसिद्धी मिळाली नाही. ज्यानंतर ‘मैने प्यार क्यू किया’ या चित्रपटातून सलमानने कतरिनाला लाँच केलं आणि तिच्या करिअरला एक गती मिळाली. कॅट आणि सलमानच्या ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्रीविषयीसुद्धा बऱ्याच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.

सोनाक्षी सिन्हा-
‘दबंग’ या चित्रपटासाठी खुद्द सलमाननेच सोनाक्षी सिन्हाची निवड केली होती. बॉक्स ऑफिसवर ‘दबंग’ सुपरहिट ठरलाच. पण, त्यासोबतच सोनाक्षीच्या करिअरलाही चालना मिळाली.

झरीन खान-
समलमाननेच झरीन खानला ‘वीर’ या चित्रपटासाठी निवडलं होतं. या चित्रपटात ती एका राजकन्येच्या भूमिकेत झळकली होती. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर पहिल्या चित्रपटातच सलमानसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळणं ही बाब झरीनच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरली.

डेझी शाह-
‘तेरे नाम’ चित्रपटातील ‘लगन लगन लागी’ या गाण्यात साइड डान्सरच्या भूमिकेत झळकणाऱ्या डेझी शाहलाही सलमानने कलाविश्वात आपल्या अभिनयाची वेगळी बाजू सादर करण्याची संधी दिली. सलमानच्या काही खास मित्रमैत्रीणींच्या यादीतही डेझीच्या नावाचा समावेश आहे. ‘जय हो’ या चित्रपटासाठी सलमानने तिची निवड केली होती. ज्यानंतर डेझी एक अभिनेत्री म्हणून बी- टाऊनमध्ये नावारुपास आली.

हिमेश रेशमिया-
संगीतकार, गायक हिमेश रेशमिया याच्या वाट्याला आलेल्या प्रसिद्धीचं सर्व श्रेय तो स्वत: सलमान खानला देतो. विविध कार्य्क्रमांमध्येही त्याने अनेकदा याविषयी आपलं मत मांडलं आहे.