बॉलिवूडमध्ये २०१८ या वर्षांत अनेक महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित झाले. यावर्षात रणबीर कपूरच्या ‘संजू’ चित्रपटानं कमाईचे अनेक विक्रम मोडले. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आमिर- अमिताभ बच्चन यांच्या ‘ठग्स’नंही सहा विक्रम मोडले आहे. २०१८ मधला पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट तो ठरला आहे. या निमित्तानं २०१८ मधले top 5 box office openers चित्रपट कोणते ते पाहू.

ठग्स ऑफ हिंदोस्तान
८ नोव्हेंबरला ठग्स ऑफ हिंदोस्तान प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी ५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. हिंदी, तामिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. विजय कृष्णा आचार्य यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी कमाईच्या बाबतीत तो सुपरहिट ठरला आहे.

संजू
राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजू हा चित्रपट २०१८ मधला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी ३४.७५ कोटींची कमाई केली होती. वादग्रस्त अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात रणबीरची प्रमुख भूमिका होती.

रेस ३
या वर्षी ईदला प्रदर्शित झालेल्या रेस ३ नं पहिल्यादिवशी २९.१७ कोटींची कमाई केली होती. रेस ३ ला देखील समीक्षकांकडून नापसंती मिळाली होती. मात्र सलमानचा चाहता वर्ग आणि त्यातून इदची सुट्टी असल्यानं या चित्रपटाला कमाईचा चांगला फायदा झाला होता.

गोल्ड
१५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटानं देखील पहिल्याच दिवशी २५.२५ कोटींची कमाई केली होती. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा अक्षयचा पहिलाच चित्रपट ठरला.

बाघी २
टायगर श्रॉफ दिशा पटानीचा ‘बाघी २’ देखील अनपेक्षितरित्या सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटानं एकूण १५० कोटींहून अधिकाचा गल्ला जमवला आहे.