झगमगत्या रंगमंचावर दोन खुच्र्या मांडलेल्या, संगीताचा प्रचंड दणदणाट आणि तेवढय़ात पडद्यामागून महानायक अमिताभ बच्चन अवतरतो.. प्रेक्षकांना अभिवादन करून आपल्या खास खर्जातल्या आवाजात ‘.. तो देवियों और सज्जनो, चलिये हम और आप खेलते है..’ प्रेक्षकांमधून आपसूक उत्तर येते ‘.. कौन बनेगा करोडपती’. कौन बनेगा करोडपती या प्रचंड गाजलेल्या कार्यक्रमाचे आठवे पर्व या महिन्यापासून सुरू होणार आहे. या पाश्र्वभूमीवर सुरत येथे नुकताच या कार्यक्रमाचा ‘लाइव्ह प्रीमियर’ आयोजित करण्यात आला होता. तब्बल सात हजार प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ‘आलिया भटने चित्रपटांत यांपैकी कोणाचे चुंबन घेतलेले नाही?’ अशा प्रकारचा एक प्रश्न यावेळी स्पर्धकांना विचारण्यात आला होता, यावरूनच आठव्या पर्वात प्रश्नांचा दर्जा काय असेल याची कल्पना येते.
सुरत येथील एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘कौन बनेगा..’चा लाइव्ह प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. अमिताभ यांना याचि देहा याचि डोळा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती. ‘कॉमेडी नाइट्स विथ..’ कार्यक्रमाचा सूत्रधार कपिल शर्मा याने सूत्रसंचालन केले. मात्र, प्रेक्षकांना खरी प्रतीक्षा होती अमिताभ यांच्या आगमनाची. तितक्यात कपिलने अमिताभ बच्चन यांचे नाव घोषित केले आणि मागच्या दारातून तो महानायक प्रेक्षकांच्या मधून त्याच्या काही गाजलेल्या गाण्यांवर नृत्याचा ठेका धरत सभागृहात दाखल झाला. स्टेजवर येताच अमिताभ यांनी स्टेजचा ताबा घेत प्रेक्षकांशी थोडा संवाद साधला. उपस्थित प्रेक्षकांमधून संगणकाच्या माध्यमातून पहिल्या दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली आणि केबीसीच्या खेळाला सुरवात झाली.
आता मात्र मघापासून अमिताभकडे किळलेल्या नजरा टिव्ही स्क्रिनवर केंद्रित झाल्या. अमिताभ यांनी ज्याक्षणी स्पर्धकांना पहिला प्रश्न सांगितला, त्याक्षणी जणू आपणच ‘फास्टर्स फिंगर फर्स्ट’ खेळतोय अशा आविर्भावात प्रेक्षक भराभरा उत्तर देऊन मोकळे झाले. पहिली स्पर्धक दीपिका जगयानी हॉटसीटवर विराजमान झाली आणि केबीसीच्या खऱ्या खेळाची सुरवात झाली.  मजलदरमजल करत दीपिका जगयानी यांनी सहा लाख चाळीस हजार रक्कम जिंकत खेळ आवरता घेतला. कार्यक्रमाच्या दरम्यान निती मोहन, मईयांग चँग आणि सोनी वाहिनीवरील इतर कलाकारांनी गाणी आणि नृत्य सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. रात्री बाराच्या सुमारास ‘यहाँसे कोई खाली हाथ नहीं जाता’ ही केबीसीमधली उक्ती सार्थ करत, उपस्थितांना आठवणींचे गाठोडे देत अमिताभ बच्चन यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

आलियाचे चुंबन आणि ८०,०००चा प्रश्न
सामान्यज्ञान आणि बुद्धिमत्तेचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केबीसीमध्ये ८०,००० रुपयांसाठी ‘आलिया भटने चित्रपटामध्ये यांपैकी कोणाला चुंबन केले नाही?’ हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा प्रेक्षकही थक्क झाले. प्रश्नाचे उत्तर ऐकल्यावर प्रेक्षकांमध्येही हशा पिटला आणि त्यात यंदा केबीसीमधील प्रश्नांचा दर्जा इतका खालवणार आहे का? हा प्रश्न मात्र निरुत्तरीत राहिला.

केबीसीचे बदललेले स्वरुप
यंदाच्या पर्वामध्ये सात कोटी जिंकायची संधी स्पर्धकांना मिळणार असून त्यासाठी त्यांना चौदा प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागतील. तसेच ‘त्रिगुणी’ आणि ‘कोड रेड’ या दोन नवीन लाईफलाईन्सचा समावेश करण्यात आला आहे. ‘त्रिगुणी’मध्ये तज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असून ‘कोड रेड’ने स्पर्धकाच्या कुटुंबातील सदस्यांना त्याला योग्य ठिकाणी खेळ सोडण्याचा सल्ला देता येणार आहे.