संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पद्मावत’ अखेर प्रदर्शित झाला आहे. बुधवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून देशभरातील चित्रपटगृहांमध्ये ‘पद्मावत’ प्रदर्शित होणार आहे. मात्र, राजपूत संघटना आणि करणी सेनेचा विरोध काही केल्या कमी होत नाही. बुधवारी दिवसभरात विविध ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीचे सत्र सुरुच होते. काही ठिकाणी तणावग्रस्त परिस्थिती असल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मल्टिप्लेक्स आणि मोठमोठ्या मॉल्सबाहेर पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने राजस्थान आणि मध्यप्रदेश सरकारच्या चित्रपट प्रदर्शन बंदीबाबतच्या फेरविचार याचिका फेटाळल्यानंतरही बंदीची मागणी सातत्याने करणी सेनेकडून केली जात आहे.

चित्रपटबंदीसाठी देशभरात असलेल्या तणावग्रस्त परिस्थितीचे लाइव्ह अपडेट खालीलप्रमाणे- 

– गुरुग्राममधील इनॉक्स थिएटरबाहेर सुरक्षाव्यवस्था तैनात

-गुरुग्राममधील सोहना रोड येथे बसवर दगडफेक. बुधवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून गुरुग्राममधील क्लब आणि बार बंद ठेवण्याचे आदेश.

-‘पद्मावत’विरोधातील निदर्शनांदरम्यान मेरठमधील पीव्हीएस मॉलवर दगडफेक

-मुंबईत करणी सेनेचे ५० कार्यकर्ते तर अहमदाबादमध्ये ४८ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

– करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह कालवींनी दिला ‘जनता कर्फ्यू’चा इशारा. ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शन बंदीच्या मागणीवर कायम असल्याचे केले स्पष्ट

-गुरुग्राम आणि लखनऊमध्ये चित्रपटगृहांबाहेर पोलीस सुरक्षा वाढवली. करणी सेनेच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त

-करणी सेनेने दिल्ली- जयपूर महामार्ग अडवला.

-चित्तोडगड येथील श्री राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाला अटक. १९००हून अधिक महिला तिथल्या किल्ल्यांमध्ये जाऊन ‘जौहर’ करणार असल्याची धमकी करणी सेनेच्या प्रवक्त्याने दिल्यानंतर पोलिसांची कारवाई

– राजस्थानमधील चित्तोडगडावरील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली.

– ‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध करणाऱ्या करणी सेनेचे ३० कार्यकर्ते मुंबई पोलिसांच्या ताब्यात. चित्रपट प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

– मंगळवारी अहमदाबादमध्ये झालेल्या तोडफोड प्रकरणी करणी सेनेचे ४४ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात