|| सुहास जोशी

नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ची जोरदार चर्चा सुरू असताना यूटय़ूबवरदेखील काही तरी पाहण्याजोगे दिसते आहे. त्यातील काही प्रयोग जमलेत तर काही चांगलेच गडबडले आहेत. मोफत व्हिडीओज दाखवणारे यूटय़ूब लाडके असले तरी आता यूटय़ूब स्वत:च पैसे गुंतवून वेबसीरिजची निर्मिती करत आहे आणि ते पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून पैसेदेखील घेत आहे. ‘यूटय़ूब ओरिजिनल्स’ या लेबलखाली येणाऱ्या या वेबसीरिजमध्ये ‘लायझा ऑन डिमांड’ ही अमेरिकी सीरिज तरुणाईमध्ये चांगलीच चर्चेत आहे.

‘लायझा कोशी’ या गाजलेल्या यूटय़ूबरला मध्यवर्ती भूमिकेत ठेऊन ही सीरिज साकारली आहे. लायझा ही पंचविशीतली एक अवखळ, अल्लड पण अनेक हिकमती करणारी तरुणी आहे. कोणत्याही प्रकारची कामं करणारे मनुष्यबळ पुरवणाऱ्या ‘टास्कइट’ या सेवा पुरवठादाराकडे ती काम करत असते. ‘टास्कइट’कडे अशा कुशल लोकांची फौजच असते. घरात लाकडी फडताळे लावण्यापासून ते सामानाची वाहतूक करणे अशा कोणत्याही कामासाठी ग्राहकाला ‘टास्कइट’वरील व्यक्तीची ऑनलाइन निवड करता येते. मोबदल्याबरोबरच ‘टास्कइट’च्या व्यक्तीने केलेल्या कामाबद्दलची प्रशंसा स्टारद्वारे नोंदवायची सुविधा असते. लायझाला पाच स्टार मिळवून वरच्या वर्गात म्हणजेच इलिट टास्कर (सर्व काम करणारे) व्हायचे असते. पण ती मुलगी असल्याने तिला शारीरिक कष्टाची कामं मिळत नसतात. त्यातच ती जी काही कामं करत असते त्यात काही ना काही गडबड होत असते.

लायझा हे अतिशय मजेशीर आणि अवखळ असं पात्र आहे. गंभीर होणं, उगाच कशाचा तरी विचार करत राहणं यापेक्षा जे समोर येईल त्यानुसार वर्तणूक करणं, रडारड न करता मस्त जगणं हे तिच कॅरेक्टर. त्यामुळेच संपूर्ण मालिकेत ती शब्दश: धुमाकूळ घालत असते. ती पुन्हा शाळेत जाते, अधिक कामं मिळावी म्हणून पुरुष होऊन वावरते, ऑर्चिडबरोबर गप्पा मारण्याचं कामपण स्वीकारते असं बरंच काही करते. तिचा उत्फुल्ल असा वावर हाच मालिकेचा यूएसपी आहे. पण त्याचबरोबर पटकथेत खूप खोचकपणे अमेरिकनांच्या वर्तणुकीवर टीकादेखील केली आहे. त्यातून उपहासपण साधतो आणि लायझाच्या करामतीलादेखील वाव मिळत राहतो.

ही मालिका चांगली असली तरी यूटय़ूबच्या प्रीमियर सेवेअंतर्गत असल्यामुळे त्यासाठी पैसे मोजावे लागतात. भारतीयांना त्यासाठी तिसऱ्या भागापासून प्रत्येक भागाला ५० रुपये मोजावे लागतात. आणि प्रत्येक भागाला पन्नास रुपये भरून पाहण्याएवढे काही ते उत्तम नाही हे नक्कीच. यावर भविष्यात यूटय़ूबला मात्र विचार करावा लागेल. कारण माफक पैसे भरून ऑनलाइन कंटेट पाहणाऱ्यांची संख्या भारतात रोज वाढत असताना या अव्वाच्या सव्वा दराचा फटका यूटय़ूबलाच बसू शकतो.

‘बिंदास’ या यूटय़ूब चॅनेलच्या ‘गर्ल इन द सिटी’ या हिंदी वेबसीरिजच्या तिसऱ्या चॅप्टरचे दोन भाग गेल्या पंधरवडय़ात प्रदर्शित झाले आहेत. हिंदी वेबसीरिजमधील ही एक आश्वासक म्हणावी अशी सीरिज आहे. किंबहुना आश्वासक चेहऱ्याच्या मिथिला पालकरमुळे ही सीरिज अधिक आश्वासक झाली आहे. तिसऱ्या सीझनमध्ये मीरा सेहगल (मिथिला पारकर) ही मुलगी या शहराला चांगलीच सरावलेली आहे. स्वत:चा व्यवसाय, स्वत:चं शोरूम असं तिला बरंच काही खुणावतंय. त्यासाठी ती जीव तोडून काम करतेय, पण तेवढय़ाच अडचणीदेखील आहेत. तिची धडपड, आशावाद हा प्रचंड आहे.

हिंदी वेबसीरिजमधला एरवी सर्रासपणे दिसणारा उथळपणा ‘गर्ल इन द सिटी’मध्ये अजिबात दिसत नाही. योग्य संवाद, योग्य ती लोकेशन्स अशा अनेक बाबींचा अगदी व्यवस्थित वापर केल्याने चांगले निर्मितीमूल्य असणारी ही वेबसीरिज आहे. प्रेक्षकांची उत्सुकता टिकवत मांडणी करण्याचे तंत्रदेखील वाखाणण्याजोगे आहे.

लायझा कोशी आणि मिथिला पालकर या दोन देशांतल्या पण वयाच्या एकाच टप्प्यावरच्या मुली आहेत. त्यांची धडपड ही सारखीच आहे. आपापल्या सभोवतालाशी निगडित गोष्टी सहजपणे त्या मांडतात. दोघींनी ऑनलाइन व्हिडीओ तंत्र अवगत केले आहे आणि त्यात वावदूकपणा न करता काही तरी दर्जेदार साकारण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. या दोन्ही वेबसीरिज पाहिल्यावर वेबसीरिज या नवीन माध्यमावर भविष्यात तरुणाईचा पगडा आणखीनच वाढणार असल्याचं जाणवतं.

हे दोन चांगले प्रयोग असतानाच दोन अगदीच गचाळ सादरीकरण असणारे देखील काही यूटय़ूबवर दिसते. एक म्हणजे टीव्हीएफ यूटय़ूब चॅनलचे ‘ये मेरी फॅमिली’ आणि टाईमलाईनर्स चॅनेलवरील ‘इंजिनीअिरग गर्ल्स.’ या दोन्ही वेबसीरिज पाहताना सीरिजकर्त्यांना नेमकं काय सांगायचं आहे याचा कसलाही पत्ता लागत नाही. एक प्रसंग सुचला म्हणून चित्रित केला, मग दुसरा सुचला म्हणून तो पण चित्रित केला. पहिल्याचा दुसऱ्याशी काही संबंध नाही, त्यात एक सलग गोष्टपण नाही आणि स्वतंत्रपणे तो प्रसंग पाहून काही कळत पण नाही, असंच या दोन्ही सीरिजचं वर्णन करावं लागेल. त्यात पुन्हा गोंधळ म्हणजे ‘ये मेरी फॅमिली’ ही सीरिज नव्वदच्या दशकात जाऊन पाहावी लागते. तो काळ उभा करताना काही चांगले प्रयत्न केले आहेत (म्हणजे त्या काळातील दूरदर्शनवरील जाहिरातींतील उत्पादने वापरून वगैरे.) पण त्याच वेळी असंख्य ढोबळ चुकादेखील आहेत. त्याची यादी करण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही.

कलाकृतीतच एखाद्या उत्पादनाची जाहिरात करून त्याद्वारे पैसे उभे करणं हा अगदी राजरोस प्रकार आहे. म्हणजेच प्रॉडक्ट प्लेसमेंट किंवा इन फिल्म ब्रॅण्डिंग. हा प्रकार बेमालूमपणे केला तर सहज खपून जातो अन्यथा चांगलाच खटकतो. ‘गर्ल इन द सिटी’मध्ये एका सौंदर्यप्रसाधनाचं ब्रॅण्डिग इतकं विसंगत आहे की ते लगेचच लक्षात येतं. तर ‘इंजिनीअिरग गर्ल्स’मध्ये तर शेवटची एक-दोन मिनिटं केवळ ब्रॅण्डिगच पाहावं लागतं. हे टाळणं आपल्याला कधी जमणार त्याचं उत्तर मात्र आपल्याकडे नाही.