मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात अनलॉकची हाक देत टाळेबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनलॉकच्या पहिल्याच टप्प्यात राज्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या काळात काही जण अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे. अशा उगाच घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी जनतेला आवाहन केलं आहे.

“नमस्कार, लॉकडाउन हळूहळू कमी करण्यात येत आहे. मात्र माझी सगळ्यांना एक मनापासून विनंती आहे. कृपया सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या, नियमांचं पालन करा. लॉकडाउन कमी करण्यात येतोय म्हणजे याचा अर्थ असा नाही की करोना विषाणूचं संकंट टळलं आहे. त्यामुळे सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुचनांचं,नियमांचं पालन करा”, असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं आहे.

दरम्यान, अलिकडेच राज्यात लॉकडाउनच्या अटी शिथील करण्यात आल्या. मात्र या काळात अनेक जण अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी दाटून येत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे लता मंगेशकर या सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून अनेकदा समाजात घडणाऱ्या घटनांवर त्या व्यक्त होत असतात.