लॉकडाउनमुळे एकीकडे सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतानाही चित्रपट सृष्टीतील काही अभिनेते अडचणीत आहेत. प्रसिद्ध पंजाबी अभिनेते सतीश कौल यांना सध्या प्रचंड आर्थिक समस्या जाणवत आहे. सतीश कौल यांनी अनेक हिंदी चित्रपट तसंच महाभारतातही काम केलं आहे. दरम्यान सतीश कौल यांनी आपण वृद्धाश्रमात असल्याचं वृत्त चुकीचं असून अफवा असल्याचं सांगितलं आहे.

सतीश कौल यांनी ३०० हून अधिक पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. महाभारतात त्यांनी इंद्राची भूमिका केली होती. “मी लुधियानात एका छोट्या भाड्याच्या घरात राहत आहे. मी आधी वृद्धाश्रमात राहत होतो. पण सत्या देवी यांच्यामुळे सध्या भाड्याच्या घरात जागा मिळाली आहे. माझी प्रकृती चांगली आहे. पण लॉकडाउनमुळे परिस्थिती बिघडू लागली आहे”.

“औषधं, भाजी आणि काही मुलभूत गोष्टींसाठी मी झगडत आहे. मला मदत करा असं मी चित्रपटसृष्टीला आवाहन करतोय. अभिनेता असताना माझ्यावर इतक्या जणांनी प्रेम केलं. पण आता मला एक माणूस म्हणून मदतीची गरज आहे,” असं सतीश कौल यांनी सांगितलं आहे.

७३ वर्षीय सतीश कौल यांनी ‘प्यार तो होना ही था’, ‘आंटी नंबर १’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसंच ‘विक्रम और वेताल’ सारख्या कार्यक्रमातही झळकले होते. सतीश कौल यांनी २०११ मध्ये पंजाबला जाऊन अॅक्टिंग क्लास सुरु केला होता. “२०१५ मध्ये माझ्या पाठीचं हाड मोडल्यानंतर जे काम सुरु होतं ते थांबवावं लागलं. दोन वर्ष मी रुग्णालयात होतो. नंतर मला वृद्धाश्रमात जावं लागलं. तिथे मी दोन वर्ष राहिलो,” असं सतीश कौल सांगतात.

आपण अभिनय करत असताना लोकांनी जे प्रेम दिलं त्याचा फार अभिमान वाटतो असं सांगताना आपल्याला सध्या कोणतीही तक्रार नसल्याचंही ते म्हणतात. “जर लोक मला विसरले असतील तर ठीक आहे. मला खूप प्रेम मिळालं असून त्यासाठी मी आभारी आहे. मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. मी राहू शकेन असं व्यवस्थित घर विकत घेण्यासाठी मी सक्षम व्हावं एवढीच अपेक्षा आहे. मी अजूनही जिवंत आहे आणि सगळं काही संपलेलं नाही. मला कोणीतरी काम द्यावं अशी अपेक्षा आहे. मला पुन्हा अभिनय करायचा आहे,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.