करोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात लॉकडाउन सुरु आहे. या काळात देशातील संपूर्ण जनतेचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मोठमोठ्या कंपन्या ठप्प झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या मजुरांनी गावाकडची वाट धरली आहे. या मजुरांना मदत करण्याच्या हेतूने गेल्या कित्येक दिवसापासून अभिनेता सोनू सूद मदत करत आहे. त्यामुळेच मजुरांसाठी अहोरात्र झटणाऱ्या सोनू सूदवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात अभिनेता जितेंद्र जोशीनेदेखील त्याचं मत व्यक्त केलं आहे.
अलिकडेच जितेंद्र जोशीने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्याने देशातील सध्यपरिस्थितीवर त्यांच मत मांडलं. देशावर ओढावलेलं करोनाचं संकट, निर्सग चक्रीवाद, गर्भवती हत्तीणीला अननसातून देण्यात आलेली स्फोटकं याविषयी त्याने भाष्य केलं.
एकीकडे सोनू सूदसारखा कलाकार गरजुंना मदत करत आहे. तर दुसरीकडे काही जण मुक्या प्राण्यांना त्रास देत आहे. सध्या हे देशात काय सुरु आहे असं म्हणत “सोनू सूद लोकांना घरी पोहोचवतोय मग आपण कुठे कमी पडतोय?”, असा प्रश्न जितेंद्रने उपस्थित केला आहे.
दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेता सोनू सूद गरजुंच्या मदतीसाठी अहोरात्र झटत आहे. तो करत असलेल्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2020 11:57 am