करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद करण्यात आले आहे. अशाच परिस्थितीमध्ये ऑनलाइन शॉपिंगमध्ये फ्रॉड होत असल्याचे दिसत आहे. नुकताच एका बॉलिवूड अभिनेत्रीला याचा फटका बसला असल्याचे समोर आले. या अभिनेत्रीने वांद्रे पोलिस ठाण्यात या बाबत तक्रार दाखल केली आहे.
सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री स्नेहा उल्लालच्या कुटुंबातील एका सदस्यासोबत हा प्रकार घडला आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, संपूर्ण देशात लॉकडाउन असल्यामुळे स्नेहाच्या कुटुंबातील एका सदस्याने घरात लागणारे समान ऑनलाइन ऑर्डर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या घराच्या जवळ सामान पोहोचवणारी एक वेब साइट शोधून काढली आणि त्या वेब साईटवर दिलेल्या नंबरवर फोन केला.
सामान खरेदी करुन झाल्यावर तेथे कॅश ऑन डिलेव्हरी हा पर्याय होता. पण त्या लॉकडाउनमुळे दुकान बंद असल्याने तुमचे सामन मी गोडाऊनमधून आणून देतो असे समोरच्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर स्नेहाच्या कुटुंबीयांनी त्याला कार्ड स्वाइप मशीन घेऊन येण्यास सांगितले. त्या व्यक्तीने ती मशीन खराब झाली असल्यामुळे तुम्हाला पैसे ऑनलाइन द्यावे लागतील असे म्हटले.
त्यानंतर त्या व्यक्तीने स्नेहाच्या कुटुंबातील सदस्याकडे सामानाचे पैसे घेण्यासाठी एटीएम कार्डची माहिती मागितली. पैसे दिल्यानंतर बराच वेळ झाला तरी सामान घरी पोहोचले नाही. काही वेळाने तिच्या कुटुंबीतील सदस्याच्या बँक खात्यामधून २५,००० रुपयांची रक्कम काढल्याचा मेसेज आला. तो मेसेज पाहून स्नेहाने लगेच वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
स्नेहाने २००५ मध्ये सलमान खानच्या ‘लकी: नो टाइम फॉर लव’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने तेलुगू, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्ये देखील काम केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2020 11:39 am