‘दम लगा के हईशा’, ‘टायलेट : एक प्रेम कथा’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘शुभ मंगल सावाधन’ यांसारख्या चित्रपटापासून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री भूमि पेडणेकर लवकरच ‘सोनचिडिया’ चित्रपटात दिसणार आहे. आणिबाणीच्या काळातील चंबळ मधल्या दरोडेखोरांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटात भूमिसोबत सुशांत सिंग राजपुतही प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात भूमि स्वत: दरोडेखोराची भूमिका साकारत आहे आणि याच भूमिकेसाठी तिनं स्वत:ला तब्बल ४५ दिवस घरात को़ंडून घेतलं होतं.

‘कलाकारानं नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे. एखादी भूमिका करताना त्या भूमिकेत शिरणं, ती भूमिका जगणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सोनचिडियासाठीही तितकीच मेहनत घेणं आवश्यक होतं. या चित्रपटात मी दरोडेखोराची भूमिका साकरत आहे. मला त्यांची मानसिकता समजून घेणं आवश्यक आहे म्हणूनच मी स्वत:ला ४५ दिवस कोंडून घेतलं असं भूमी एका मुलाखतीत म्हणाली. या ४५ दिवसांत केवळ घरचेच माझ्या संपर्कात होते. मी जगाशी संपर्क तोडला होता. चंबळला या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पोहोचले तेव्हा माझा जगाशी संपर्क आला असंही भूमी म्हणाली. अभिषेक चौबे दिग्दर्शित हा चित्रपट ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.