News Flash

मालिकेच्या नभांगणात ‘लोकांकिका’चे तारे!

दर नव्या वर्षांला नव्याने महाविद्यालयात शिरताना विद्यार्थ्यांच्या मनात अनेक नवे संकल्प असतात, नवे विचार असतात, नव्या कल्पना असतात.

| July 19, 2015 02:01 am

दर नव्या वर्षांला नव्याने महाविद्यालयात शिरताना विद्यार्थ्यांच्या मनात अनेक नवे संकल्प असतात, नवे विचार असतात, नव्या कल्पना असतात. नाटय़वेडाचा स्पर्श असलेल्या विद्यार्थ्यांना नव्या महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर केवळ आणि केवळ एकांकिका स्पर्धाच खुणावत असतात. ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेने पहिल्याच वर्षी दमदार प्रवेश करत महाविद्यालयीन विश्वात आणि खास करून तरुणाईच्या मनात घर केले आहे. आता या वर्षीच्या दुसऱ्या पर्वाचीही जोरदार तयारी सुरू झाली असून त्याचा आवाज राज्यभरातील महाविद्यालयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षी टॅलेंट सर्च पार्टनर म्हणून महत्त्वाची साथ देणाऱ्या ‘आयरिस प्रॉडक्शन’ आणि ‘अस्तित्व’च्या मदतीने पुन्हा एकदा ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धाचे नवे पर्व रंगणार आहे.
येत्या २९ सप्टेंबरला ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा सुरू होतील. त्याआधी लोकांकिकांच्या पहिल्या पर्वात आपल्या अभिनयाने नाटय़क्षेत्रातील पारख्यांना आपली दखल घ्यायला लावणाऱ्या गुणवान कलावंतांचे अनुभव नव्या स्पर्धकांना नवी दृष्टी देणारे आहेत.
‘लोकांकिका’ स्पर्धेत उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाने ‘मड वॉक’ ही एकांकिका सादर केली होती. या एकांकिकेतील कलाकार श्रीकांत भगत आज व्यावसायिक नाटकात काम करतो आहे. ‘जाऊ द्या ना भाई’ या नाटकासाठी नुकत्याच झालेल्या ‘झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्ड्’साठी त्याला सवरेत्कृष्ट साहाय्यक भूमिकेसाठी नामांकनही मिळाले होते. ‘आयरिस प्रॉडक्शन’ने श्रीकांतला आपल्या ‘देवयानी’ या मालिकेत काम करण्याची संधी दिली. शिवाय, नुकतेच त्याने ‘झी मराठी’च्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील एका भागातही काम केले आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेनंतरचा आपला अभिनयाचा प्रवास वेगाने पुढे पुढे जातो आहे, अशा शब्दांत श्रीकांतने आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘लोकांकिका’चा वरदहस्त

माझा जन्म साताऱ्याचा. लहानपणीच शिक्षणासाठी आमचे कुटुंब मुंबईत आले. आधी डोंबिवलीत आणि मग सातवीनंतर आम्ही अंबरनाथमध्ये स्थिरावलो. अभिनयाची आवड लहानपणापासून असली तरी मालिका किंवा नाटय़ क्षेत्रातही कधी आपला प्रवेश होऊ शकेल, असा विचार के ला नव्हता. उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर एकांकिका स्पर्धाशी ओळख झाली. खरे तर, मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होतो; पण काही केल्या अभ्यासात मन लागत नव्हते. अखेर, ज्या क्षणी आपल्याला अभिनयाच्याच क्षेत्रात रस आहे याची जाणीव झाली तेव्हा कलाशाखेत नव्याने प्रवेश घेतला, मात्र मध्ये शिक्षणाची तीन वर्षे फुकट गेली होती. या काळात मी गणपतीच्या मूर्ती विकण्याचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय आणि अभिनय दोन्ही सांभाळण्यासाठी माझे दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र आणि विनोद गायकर यांनी प्रचंड मदत केली. याशिवाय महाविद्यालयातील प्राध्यापक नितीन आरेकर आणि नीना आनंद यांनीही मला वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे आर्थिक जबाबदारी सांभाळून नाटय़ व्यवसायात करिअर करण्याचे स्वप्न मी पूर्ण करू शकतोय. माझ्या व्यवसायाचे हे तिसरे वर्ष आहे. या वर्षी माझा छान जम बसलाय आणि त्याच वेळेस ‘लोकसत्ता लोकांकिका’मधून आमच्या महाविद्यालयाच्या ‘मडवॉक’ या एकांकिकेत मला काम करायला मिळाले. ‘लोकांकिका’ स्पर्धेचे महत्त्व फार निराळे आहे. पहिल्याच वर्षी या स्पर्धेने आपला दबदबा निर्माण केलाय. आतापर्यंत ठाणे विभागातील महाविद्यालये प्रस्थापित एकांकिका महोत्सवांमध्ये फार पुढे जाऊ शकत नव्हती. खरे तर या महाविद्यालयांनी आतापर्यंत निकोप स्पर्धा करण्यावर भर दिला आहे. ‘लोकांकिका’मुळे त्यांना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले आहे. ‘लोकांकिका’नंतर मी ‘देवयानी’ या मालिकेत काम केले. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेचा भाग केला आणि ‘जाऊ द्या ना भाई’सारखे व्यावसायिक नाटकही करतो आहे. या सगळ्यामागे कुठे तरी ‘लोकांकिका’ स्पर्धेमुळे मिळालेली ओळखही कारणीभूत आहे असे मला वाटते. ‘लोकांकिका’ स्पर्धा पाहण्यासाठी जे प्रेक्षक तसेच नाटय़कर्मी आले होते ते आजही आमच्याशी जोडले गेले असून जेव्हा कधी भेटण्याची संधी मिळते तेव्हा ते आमचा पुढचा मार्ग कसा आहे याची चौकशी करतात. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा ही अशीच दमदारपणे सुरू राहिली पाहिजे तरच आमच्यासारख्या कलाकारांना अभिनयाच्या क्षेत्रात पुढे जाताना मोलाची मदत होऊ शकते. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला महाविद्यालयीन तरुणांकडून अधिक चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास वाटतो.
श्रीकांत भगत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 2:01 am

Web Title: lokankika stars in serials
टॅग : Lokankika,Serials
Next Stories
1 काव्यात्म भावनांचा ‘कोलाज’
2 नव्यांचा ‘हिरो’!
3 अतिरंजित मेलोड्रामाचा नमुना
Just Now!
X