नाटय़वर्तुळात मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ‘लोकसत्ता’ आयोजित ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत, ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पार पडते. ‘आयओसीएल’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी मे. बी. जी. चितळे डेअरी हे असोसिएट पार्टनर आहेत. तर दरवर्षीप्रमाणे लोकांकिकाच्या मंचावरील गुणवान कलाकारांना चित्रपट-मालिका क्षेत्रात उतरण्याची संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे यंदाही स्पर्धेचे टॅलेण्ट पार्टनर आहेत.

सहाव्या वर्षांत पदार्पण केलेली ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही केवळ महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा राहिलेली नाही, तर ती एक नाटय़ चळवळ आहे, असे मत प्रसिद्ध लेखक प्रशांत दळवी यांनी व्यक्त केले. रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांवर लेखक म्हणून आपला ठसा उमटवणारे, गेली कित्येक वर्षे या दोन्ही माध्यमांसाठी दर्जेदार पटकथा लेखन करणारे प्रशांत दळवी यांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा जवळून अनुभवली आहे. कलाकारांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ यंदाचे सहावे पर्व डिसेंबर महिन्यात रंगणार आहे. त्यानिमित्ताने गेल्यावर्षी याच स्पर्धेसाठी मुंबई विभागीय अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिलेल्या प्रशांत दळवी यांनी त्यांचे ‘लोकांकिका’संदर्भातील अनुभव सांगितले.

गेली पाच वर्षे मी नियमित ‘लोकसत्ता लोकांकिके ’ची फेरी पाहतो आहे. दोन वर्षे या स्पर्धेचे परीक्षण करण्याची संधी मला मिळाली. हे परीक्षण करताना वेगळ्या आशयाची तसेच सामाजिक भान राखत नाटके सादर करण्यात आलेली मला पाहायला मिळाली, असे त्यांनी सांगितले. अभिनय, दिग्दर्शन, विषयांची निवड, मांडणी आणि तंत्रज्ञान यांमध्ये स्पर्धकांनी नवीन प्रयोग केलेले दिसून आले. ‘लोकांकिका’ स्पर्धेविषयी महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते की दोन एकांकिकांच्या दरम्यान लेखक आणि कलाकारांशी संवाद घडवून आणला जातो. त्यामुळे कलाकार नवीन गोष्टी शिकतात. तसेच फेरी पार पडल्यानंतर कलाकार तज्ज्ञ लेखक आणि दिग्दर्शकांशी संवाद साधतात.  प्रश्न विचारल्यामुळे कलाकारांच्या शंकाचे निरसनही होते. परीक्षक आणि कलाकार यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते. अशा स्पर्धामुळे विद्यार्थी महाविद्यालयीन जीवनातच रंगमंचीय परिभाषेत व्यक्त व्हायला शिकतात, असे अनुभवी निरीक्षण त्यांनी मांडले.

या स्पर्धेसाठी कलाकार जी मेहनत घेतात ती पाहून आपले महाविद्यालयीन दिवस आठवल्याचेही दळवी यांनी नमूद केले. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सर्व कलाकार जीव तोडून मेहनत करत असतात. महिनाभर नाटकाच्या तालमी सुरू असतात, संहितेचे वाचन केले जाते. कलाकारांचे हे काम, सळसळती ऊर्जा पाहून मला माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण येते. ‘लोकांकि के’च्या महाअंतिम फेरीस अनेक ज्येष्ठ रंगकर्मी उपस्थित असतात. दरवर्षी माध्यमे, आजच्या चालू घडामोडी, सामाजिक समस्या हे विषय नाटकातून मांडण्यात येत असल्याने विषयांच्या मांडणीतही सातत्याने वैविध्य  दिसून येते. ‘लोकांकिका’सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची संघ भावना वाढीस लागते. संघभावनेशिवाय कोणतेही नाटक तडीस जात नाही. या स्पर्धामुळे कलाकारांच्या कलागुणांना मोठे व्यासपीठ लाभते, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे, याकडे लक्ष वेधत या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संपूर्ण ताकदीनिशी उतरून परीक्षकांना आपल्या प्रयोगाने चकीत करून सोडावे, असे आवाहनही त्यांनी तरुणाईला केले.

‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा नसून रंगकर्मीसाठी एक चळवळ आहे, यात कलाकारांचा कस लागतो. तरुणांना व्यक्त होण्यासाठी ‘लोकसत्ता’ वृत्तपत्राने सुरू केलेल्या ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ तसेच तरुणाच्या कार्याची दखल घेणाऱ्या ‘तरुण तेजांकित’सारख्या  पूरक  उपक्रमाबरोबरच ‘लोकांकिका’ ही स्पर्धा कलाकारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तरुण मुलांमधील नाटय़गुण जोपासण्याच्या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने पुढाकार घेत ही राज्यस्तरीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा सुरू केल्यामुळे आज नाटय़वेडय़ा विद्यार्थ्यांचे काम घराघरांपर्यंत पोहोचते आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ आपल्या उत्कृष्ट आयोजन आणि दर्जेदार नाटके  या वैशिष्टय़ांमुळे वेगळेपण राखून आहे. ही स्पर्धा राज्य पातळीवरील असल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही महाविद्यालये सहभागी होतात हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

-प्रशांत दळवी