चरित्रात्मक चित्रपटांची लाट हिंदीबरोबरच मराठीतही रुजली असून वास्तवातील तसेच इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे जीवन आणि कार्य आजच्या प्रेक्षकांच्या मनावर ठसविण्याचे आव्हान पेलून दिग्दर्शक चित्रपट निर्मिती करीत आहेत. ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटामार्फत दिग्दर्शकाने शालेय पुस्तकांमधून आपण लहानपणी शिकलेल्या लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदान आणि त्यांच्या लहानपणातल्या गोष्टी यापलीकडे जाण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. गांधीजी यांच्यापूर्वी लोकमान्य टिळक यांच्याकडे देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व होते. उत्तुंग लोकनेते म्हणून साऱ्या देशाने त्यांना मान्यता दिली होती. लोकनेता म्हणून असलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जीवनप्रवास दिग्दर्शकाने समर्पक पद्धतीने रूपेरी पडद्यावर मांडला आहे.
चरित्रात्मक चित्रपट म्हटला की अपेक्षित असलेले व्यक्तिमत्त्वाला ‘हिरो’ बनविण्याचा प्रयत्न स्वाभाविक असला तरी लोकमान्य टिळकांचा निव्वळ चरित्रात्मक जीवनपट न उलगडता त्यांचे विचार आजच्या तरुणाईला पटवून देण्याचाही मर्यादित पण यशस्वी प्रयत्न चित्रपट करतो.
‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफलं उचलणार नाही’ हे टिळकांचे बालपणीचे उद्गार आणि ‘स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ हे उद्गार सर्वच मराठी भाषकांना चांगलेच माहीत आहेत. परंतु टिळक-आगरकर यांच्यातील वैचारिक वाद तसेच टिळक-गांधीजी भेट याविषयी आजच्या प्रेक्षकांना खूप खोलवर फारसे काही माहिती नाही. दिग्दर्शकाने हे दोन्ही पैलू चित्रपटात सोप्या पद्धतीने उलगडून दाखविले आहेत. ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढय़ातील सहभाग, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ टिळकांनी केली असे महत्त्वाचे पैलू अतिशय प्रभावी पद्धतीने या चित्रपटात दाखविण्यात आले आहेत.
परंतु, टिळक-आगरकर यांची मैत्री, नंतर झालेले त्यांचे मतभेद  या प्रसंगांचे सविस्तर चित्रण केल्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणून देशभरात ओळखले जाऊ लागले ते ठसविण्यात चित्रपट यशस्वी ठरत नाही. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी लिहिलेला ‘गीतारहस्य’ हा महत्त्वाचा ग्रंथ असेल किंवा रॅण्डच्या खुनामागील कटातील सहभाग असेल हे सारे प्रसंग दाखवूनही टिळक देशपातळीवर भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व करणारे प्रमुख नेते कसे बनले ते दाखविणेही आवश्यक होते. केवळ स्वामी विवेकानंद, लाला लजपतराय, बिपीनचंद्र पाल आणि टिळक यांच्यातील भेटींच्या प्रसंगाचे चित्रण अगदी सर्रकन निघून जाते. तरीसुद्धा टिळकांचे गणिताचे प्रेम, त्यांना विविध विषयांची आवड होती हे पैलू मात्र दाखविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.
टिळक-आगरकर यांच्यातील वैचारिक वादाचे प्रसंग दाखविल्यानंतर अखंड चित्रपटात आगरकरांची व्यक्तिरेखा कुठेच दिसत नाही. त्याचबरोबर दाजी म्हणून टिळक ज्यांना नेहमी पुकारत आणि हे दाजी खरे टिळकांच्या कायम बरोबर असत ते नेमके कोण हे चित्रपट पाहताना प्रेक्षकाला उलगडत नाही. दाजी खरे यांच्या व्यक्तिरेखेविषयी कथानकामध्ये  अधिक दाखविणे आवश्यक होते. तसे न केल्याने टिळकांच्या विश्वासू माणसांविषयी, त्यांना सातत्याने स्वातंत्र्यलढय़ात मदत करणाऱ्या जवळच्या व्यक्तींची माहिती प्रेक्षकाला मिळत नाही.
आजच्या काळातील मकरंद या पत्रकाराला टिळकांचा मूळ आवाज ऐकण्याची संधी मिळते आणि नंतर टिळकांविषयीचे वाचन, मनन तो करतो आणि टिळकांच्या विचारांशी आजच्या काळातील शेतकरी आत्महत्या व तत्सम प्रश्नांशी तुलना मकरंद करतो आणि आजच्या काळातही टिळकांचे विचार महत्त्वाचे ठरतात हे त्याला पटते. मकरंद या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून पटकथा लेखकांनी चित्रपट उलगडत नेला असून मकरंदच्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांसमोर टिळकांचे विचार, व्यक्तिमत्त्व आणि स्वातंत्र्यलढय़ातील त्यांचे योगदान याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करताना अर्थातच फ्लॅशबॅक तंत्राचा वापर चपखलपणे केला आहे.
लोकमान्यांचे व्यक्तिमत्त्व किती उत्तुंग होते हे ठसविण्यात चित्रपट मर्यादित अर्थाने नक्कीच यशस्वी झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर यांचा अभिनय हेच आहे. बालगंधर्व यांची भूमिका पडद्यावर जिवंत करण्यात यशस्वी ठरल्यानंतर लोकमान्य टिळकांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्याचे आव्हान सुबोध भावेने उत्तम रितीने पेलले आहे. त्याचबरोबर आजच्या काळात टिळकांचे विचार किती आवश्यक आहेत, आज स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे उलटली असली तरी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न असो वा अन्य अनेक प्रश्न असोत मकरंद कसा गोंधळून गेला आहे हे दाखविणारी अवघड भूमिका चिन्मय मांडलेकरने उत्तम साकारली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील पुणे, मुंबई तसेच अन्य परिसर दाखविण्याचे आव्हान कला दिग्दर्शक, रंगभूषाकार तसेच वेशभूषाकार यांनी यशस्वी करून दाखविले आहे. कला दिग्दर्शन तसेच वेशभूषा, संगीत, पाश्र्वसंगीत, अभिनय या विभागांची उत्तम साथ दिग्दर्शकाला मिळाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात आणि ठिकठिकाणी गणपती स्थापनेचे चित्रण गाण्याच्या अनुषंगाने करण्याचे दिग्दर्शकाचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. लोकमान्य टिळक हे द्रष्टे, युगपुरुष होते हे शीर्षकानुसार ठसविण्यात चित्रपट मर्यादित अर्थाने यशस्वी नक्कीच झाला आहे.

एस्सेल व्हिजन प्रस्तुत
लोकमान्य एक युगपुरुष
निर्माती – नीना राऊत,
दिग्दर्शक – छायालेखक – प्रसाद भेंडे
पटकथा – ओम राऊत, कौस्तुभ सावरकर
संवाद – कौस्तुभ सावरकर, ओम राऊत
संगीत – अजित-समीर
पाश्र्वसंगीत – समीर म्हात्रे
संकलन – आशीष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले
वेशभूषा – महेश शेरला
कला दिग्दर्शक – संतोष फुटाणे
रंगभूषा – विक्रम गायकवाड
कलावंत – सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर,
समीर विद्वांस, अंगद म्हसकर,  
प्रिया बापट, श्वेता भेंडे,
दीपेश शहा, प्रशांत उथळे,
विक्रम गायकवाड व अन्य.